Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रिझन वॉर्ड नृत्य प्रकरणी उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:52 AM (IST)
Tags: mn1
मुख्य संशयितांना अटक का नाही?; मोबाईल आत कसे गेले? : न्यायालयाचा सवाल
5सातारा, दि. 8 : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये झालेल्या नृत्य प्रकाराची दखल उच्च न्यायालयानेही घेतली असून पोलिसांवर तीव्र शब्दात बुधवारी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुची राडा प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उर्वरित संशयितांना अजून अटक का नाही? मुख्य संशयितांवर कोणती कारवाई केली? आता पुढे काय कारवाई करणार आहात? प्रिझन वॉर्डमध्ये नृत्य होत असताना पोलीस काय करत होते? मोबाईल आतमध्ये गेलेच कसे? संशयित आरोपी एवढ्या दिवस आजारी कसे? संशयितांना नेमके काय झाले आहे? तत्काळ याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांचा जबाब घेवून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. आता या प्रकरणावर उच्च न्यायालय आठ दिवसात निकाल देणार आहे. हा निकाल काय लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलण्यावरुन चार महिन्यांपूर्वी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुचीसमोर राडा झाला होता. तोडफोड, जाळपोळ व फायरिंगसारख्या घटना घडल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास या घटनेने सातारकरांच्या काळजाचा थरकाप उडाला. या सर्व पार्श्‍वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण तीन तक्रारी दाखल झाल्या. खासदार गटातर्फे एक, आमदार गटातर्फे एक व पोलिसांतर्फे एक तक्रार दाखल झाली होती.  या सर्व तक्रारीमध्ये खा. उदयनराजे  व आ. शिवेेंद्रसिंहराजे यांच्या नावांचा थेट उल्लेख आहे. या सर्व प्रकरणात दोन्ही गटाकडून किमान दीडशे जणांचा सहभाग होता. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 20 जणांना अटक केली. त्यातील सुमारे 15 संशयित आरोग्य बिघडल्याचे कारण देत  जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये तळ ठोकून राहिले. अटकेच्या या कारवाईनंतर हळुहळू दोन्ही गटातर्फे अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आले. हे अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले. त्यामध्ये त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र नियमित जामीन मिळण्यासाठी सुनावणी सुरु आहे.
गेल्या महिन्यात सुरुची राडा प्रकरणातील तिन्ही दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर जामीनाची प्रक्रिया गतिमान झाली. जामीन मिळू लागताच प्रिझन वॉर्डमध्ये असणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्या उत्साहाच्या भरातच त्यांनी प्रिझन वॉर्डमध्ये नृत्य केले. संशयित आरोपी यावेळी मोबाईल वापरत असल्याचे समोर आले.  या घटनेने खळबळ उडाली. हा सगळा प्रकार जिल्हा न्यायालयाने गांभीर्याने घेत नृत्य करणार्‍या संशयितांना जामीन मंजूर केला. मात्र त्या संशयिताना जिल्हा बंदी केली. आता उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा नृत्य प्रकारामुळे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: