Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोवई नाक्यावरील सिटी सेंटर इमारतीसमोरील अतिक्रमण जमीनदोस्त
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 8 : सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने गुरुवारी पोवई नाक्यावरील सिटी सेंटर या इमारतीसमोरील अतिक्रमण केलेली भिंत जमीनदोस्त केली. दरम्यान, शिक्षक बँक ते तहसीलदार कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील उर्वरित खोकीधारकांनी टपर्‍या काढून घ्याव्यात अन्यथा जेसीबीने त्या हटवल्या जातील, असा इशारा अतिक्रमण पथकातील शैलेश आष्टेकर, प्रशांत निकम या अधिकार्‍यांनी दिला आहे. अतिक्रमण पथकाच्या कारवाईच्या इशार्‍यानंतर अनेक टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून पालिकेच्या अतिक्रमण पथकाला सहकार्य केले.
पोवई नाक्यावरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या पथकाचे अभिनंदन केले. सिटी सेंटर इमारतीसमोरील भिंत आणि पेव्हर काढून टाकण्यात आल्याने  रस्ता मोकळा झाला असून नागरिकांना पार्किंग करणे सुलभ होणार आहे.
साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच अधिकार्‍यांची बैठक घेवून तुमचा तुम्ही निर्णय घ्या, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेपासून सिटी सेंटर इमारत ते तहसीलदार कार्यालया-कडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवली. दरम्यान दुसर्‍या दिवशीही पोवई नाक्यावर अतिक्रमण मोहीम सुरू असताना टपरीधारकांंच्या गर्दीमुळे तणावाचे वातावरण बनले होते. मरगळलेल्या अतिक्रमण पथकाने शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. शहरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण विभागाने शहर पोलीस ठाण्याकडे पोलीस बंदोबस्त मागितला होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी  पोलीस बंदोबस्त दिल्यानंतर सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोहीम सुरू केली आहे. अतिक्रमण पथकाने बुधवारी दुपारी पोवई नाक्यावर अतिक्रमण मोहीम राबवली.पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पथक नाक्यावर दाखल झाल्यानंतर टपरीधारकांची पळता भुई थोडी झाली. कारण यापूर्वी पालिकेने या टपरीधारकांना स्वत:हून अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही टपरीधारकांनी टपर्‍या काढल्या नव्हत्या. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यानंतर टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून  घेतली. उर्वरित टपरीधारकांना उद्यापर्यंत मुदत दिली आहे.
पालिकेच्या अतिक्रमण पथकातील अधिकारी शैलेश आष्टेकर, प्रशांत निकम, भागनिरीक्षक गोविंदे मोहिते, सतीश साखरे,
श्रीकांत गोडसे, प्रकाश राजेशिर्के यांच्या पथकाने दिवसभर पोवई नाका परिसरातील अतिक्रमणे जेसीबीने हटविली. यापुढे ही
मोहीम सुरूच रहाणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहेत. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ज्यांची अतिक्रमणे आहेत अशा अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. कारवाईपूर्वीच व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून टाकावीत, असे आवाहन पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आले आहे. शिक्षक बँक ते तहसीलदार
कार्यालयाच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्यामुळे रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: