Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मंजूर
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) :भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी दि. 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाचा आदेश अद्यापपर्यंत वेबसाईटवर अपलोड झाला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून एकबोटेंना तात्पुरते संरक्षण मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशात कोणत्या कारणासाठी जामीन नाकारण्यात आला याचा अभ्यास करून एकबोटेंच्या अटकपूर्वजामीन अर्जावर 20 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे पोलिसांच्या हातात पुणे सत्र न्यायालायाने जारी केलेले अटक वारंट असूनही ते एकबोटेंना अटक करू शकणार नाहीत. भीमा-कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी रोजी शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील दलित बांधव गेले होते. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच भीमा-कोरेगाव परिसर आणि आसपासच्या गावांचे सुमारे 9 कोटींचे नुकसान झाले. या घटनेच्या निषेधार्थ 3 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती तसेच या हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे कारणीभूत असल्याचे सांगत त्यांच्या अटकेचीही मागणी केली होती. दलित बांधवांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तरीही या दोन्ही आरोपींनी पकडण्यात चालढकल आणि दिरंगाई होत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: