Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राफेल करारातील गैरव्यवहारांवर नरेंद्र मोदी गप्प का : राहुल गांधी
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा विसर पडला आहे. त्यांनी आता विरोधकांवर टीका करण्याऐवजी प्रश्‍नांची उत्तरे दिली पाहिजेत. मोदींनी लोकसभेत दीड तास भाषण केले. या भाषणात राफेल करारावरील गैरव्यवहारांच्या आरोपांचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. राफेल करारातील गैरव्यवहारांवर मोदी गप्प का, असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा ठराव मांडला. नरेंद्र मोदींनी या भाषणात काँग्रेसचा समाचार घेतला होता. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदींवर पलटवार केला.  आज नरेंद्र मोदींकडून पंतप्रधानांचे भाषण ऐकायचे होते. पण त्यांनी राजकीय भाषणच केले. प्रचारसभेत भाषण केल्यासारखे ते बोलले. मोदी दीड तास बोलले पण आंध्र प्रदेश प्रश्‍न, राफेल करार, बेरोजगारी यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. शेतकर्‍यांना कर्जमाफी, हमीभाव हे प्रश्‍न होते. पण यावरही ते काहीच का बोलले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
काय आहे राफेल वाद?
भारत व फ्रान्स यांच्यात 2008 मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे.    
समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या कराराचा तपशील उघड करण्यास नकार दिला. त्यामुळे वाद निर्माण झाला. मनमोहन सिंग सरकारचा 126 विमानांचा खरेदी प्रस्ताव रद्द करून वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेला 36 विमान खरेदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. फ्रान्स सरकारने त्याचे कंत्राट दासो एव्हिएशन या कंपनीला दिले होते. दासोने त्यासाठी सहभागीदार म्हणून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीजशी करार केला होता. रिलायन्ससाठी मोदींनी राफेल व्यवहारात हस्तक्षेप केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला आहे. पंतप्रधान स्वतः पॅरिसला गेले आणि त्यांनी खरेदी करार बदलला, असा दावा त्यांनी केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: