Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेची मुहूर्तमेढ रोवली : खोत
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 7 : महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची मुहूर्तमेढ रोवली. गाडगे महाराजांनी महाराष्ट्रातील माती व माणसांची मने स्वच्छ केली, असे प्रतिपादन कृषी, पणन व ग्रामस्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्रा. डी. के. खोत यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते. यावेळी डॉ. सुभाष एरम, दिलीप गुरव, आनंदराव कचरे, सुभाष ढगे, मधुकर सावंत, अतुल कदम, सौ. गौरी कचरे, माजी प्राचार्य कालेकर, फत्तेसिंग जाधव, मानसिंगराव जाधव, अरुण पाटील उपस्थित होते. ना. सदाभाऊ खोत म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सद्गुरू गाडगे महाराज यांच्या नावाने हे महाविद्यालय सुरू केले. थोर माणसं समाजाला फार देवून जातात. संत गाडगेबाबा, कर्मवीर अण्णा आज जरी नसले तरी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आज रयत शिक्षण संस्थेतील किंवा इतर विद्यार्थी  वाटचाल करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करीत आहेत.  थोर व्यक्तींच्या  कार्यामुळे समाजाची खर्‍या अर्थाने जडणघडण झाली आहे. पाय जमिनीवर ठेवून समाजासाठी समाजाधिष्ठित काम करावे. समाजाप्रती आस्था कायम असावी. माझे नाही हे समाजाचे आहे, अशी भावना प्रत्येकाची असावी.
प्राचार्य डॉ. राजमाने म्हणाले, रयत सेवक  विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचे काम करतात तसेच आपला विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा रहावा, त्याने स्वयंरोजगार निर्माण करावा त्यासाठी सतत मार्गदर्शन करत असतात. प्रारंभी प्रा. डी. के. खोत व सौ. अलकनंदा खोत यांचा ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष एरम,  दिलीप गुरव, सुभाष ढगे, आनंदराव कचरे व सत्कारमूर्ती प्रा. डी. के. खोत यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य एच. के. काळे यांनी स्वागत केले. प्रा. सौ. वंदना किशोर, प्रा. सौ. संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. कसबे यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, सेवक उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: