Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्तर वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागते : मोदी
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : ‘70 वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागते आहे. काँग्रेस फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गात होता. घराणेशाही करणार्‍यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. भूसंपादनाबाबतचा अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडणार्‍यांनी लोकशाही बद्दल बोलू नये, असे सांगत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर जनतेच्या सामर्थ्यामुळे देशाची प्रगती झाली असती. काँग्रेसने योग्य धोरण आखले असते तर देश आज काही पटींनी पुढे असता, असे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत मांडला. मोदींचे भाषण सुरू होताच तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद नसल्याने तेलगू देसमचे खासदार आक्रमक झाले. घोषणाबाजी थांबत नसल्याचे पाहून तशा वातावरणातच नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण केले.
काँग्रेसने सरदार पटेल यांच्यावर अन्याय केला. सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्‍न निर्माण झालाच नसता आणि संपूर्ण काश्मीर आज भारताचाच भाग असता, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. फाळणी हे काँग्रेसचेच पाप आहे. विभाजन हे काँग्रेसच्या रक्तातच असल्याची टीका त्यांनी केली.
देशातील लोकशाही ही काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंची देणगी असल्याचे काँग्रेसचे नेते सांगतात. पण हाच तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे का?, लोकशाही हा देशाच्या संस्कृतीचा एक भाग  आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कोणत्या एका पक्षाचे नसते. ते सर्वांचे असते. विरोधकांना विरोधाचा अधिकार आहे. पण माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. काँग्रेसला वास्तवाची जाणीव असती तर त्यांची ही अवस्था झाली नसती. भाजप सरकारने देशाच्या कामात बदल घडवले. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर सरकारने भर दिला, असे सांगत त्यांनी सरकारी कामांचा पाढा वाचून दाखवला. गोरगरिबांना ‘आधार’चा लाभ मिळू लागला तर आता तुम्ही आधारवर टीका करताय, असे सांगत त्यांनी काँग्रेसला फटकारले. देशात आता प्रामाणिकतेचा उत्सव सुरू असून लोक प्राप्तिकर भरण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांनी दिलेल्या पैशांचा सरकार हिशोब देईल, असा विश्‍वास लोकांना वाटू लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही ‘एमचेंजर’,
‘नेमचेंजर’ नाही : मोदींचा पलटवार
दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर राज्यसभेतही काँग्रेसवर कठोर टीका केली. पंतप्रधानांनी काँग्रेसच्या ‘नेमचेंजर’ आणि ‘पुराना भारत लौटा दो’ सह सर्वच आरोपांचे उत्तर देत आपले सरकार नेमचेंजर नसून ते एमचेंजर; (लक्ष्याचा पाठलाग करणारे) आहे, असे म्हणत काँग्रेसवर पलटवार केला.
काँग्रेसला जर न्यू इंडिया नको असेल तर काय आणिबाणी  आणि  घोटाळ्यांचा भारत  हवा आहे का, असा सवालही पंतप्रधानांनी केला. माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या पुस्तकात बोफोर्स घोटाळ्यातून काँग्रेसला कमिशन मिळाल्याचा उल्लेख असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीकेचा फास आवळला. आपले सरकार आधारचे क्रेडिट घेत नसून आधार हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्हिजन असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसला कोणता भारत हवा?
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना उत्तर देत पंतप्रधान म्हणाले, आम्हाला देखील गांधीजींचा भारत हवा आहे. कारण स्वातंत्र्य मिळाले आहे आणि आता देशाला काँग्रेसची गरज नाही. काँग्रेसमुक्त भारताचा विचार हा गांधीजींचा विचार आहे.
आम्ही तर त्यांच्या पदचिन्हांवर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला कोणता भारत हवा? लष्कराच्या जीप घोटाळे करणारा भारत हवा?, पाणबुडी घोटाळे करणारा भारत हवा?, बोफोर्स घोटाळे करणारा भारत हवा?, हेलिकॉप्टर घोटाळे करणारा भारत हवा? आणिबाणी आणणारा भारत हवा?, देशाला तुरुंग बनवणारा भारत हवा, की लोकशाहीतील हक्क हिसकावणारा भारत हवा?, असे एकापेक्षा एक प्रश्‍न मोदी यांनी उपस्थित केले.   
ते म्हणाले, मोठा वृक्ष कोसळल्यानंतर हजारो शिखांची कत्तल व्हावी, असा भारत आपल्याला हवा आहे का, हजारो लोकांच्या मृत्यूच्या गुन्हेगारास विमानात बसवून बाहेर घेऊन जाणारा भारत हवा आहे का, असे सवाल उपस्थित करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: