Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
व्याजाच्या पैशासाठी लागलेल्या तगाद्यामुळे एकाची आत्महत्या
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo4
चंद्रकांत फडतरेवर गुन्हा दाखल
5सातारा, दि. 6 : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी वारंवार दिलेल्या त्रासास कंटाळून  राजेंद्र धर्मादास घाडगे (वय 50, रा. चिरायु हॉस्पिटलसमोर, मल्हार पेठ, सातारा ) यांनी तीन आठवड्यापूर्वी आत्महत्या केली होती. या  प्रकरणी चंद्रकांत नागेश फडतरे (रा. कणसे हॉस्पिटलसमोर, सदरबझार, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घाडगे यांची पत्नी रजनी राजेंद्र घाडगे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.  राजेंद्र घाडगे हे  शाहूनगर येथून दि. 17 जानेवारी रोजी दुचाकीसह निघून गेले होते आणि बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेवूनही ते न सापडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दि. 18 रोजी देगाव, ता.सातारा येथील एका विहिरीत उडी मारून घाडगे यांनी आत्महत्या केली होती. घटनास्थळावरून सातारा तालुका पोलिसांनी  घाडगे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. घाडगे यांनी खासगी सावकार फडतरे याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार रजनी घाडगे यांनी सोमवारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. 
तक्रारीनुसार 1999 ते 2018 या कालावधीत फडतरे यांनी व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी राजेंद्र घाडगे यांना वारंवार त्रास दिला होता.  
चक्रवाढ पद्धतीने व्याजाची मागणी ते करत होते. व्याज न दिल्यास दमदाटी करत फडतरेने जबरदस्ती घाडगे यांच्याकडून कोरे स्टँप व चेक घेतले होते. या स्टॅम्प व चेकच्या मदतीने फडतरेने त्रास देत रक्कम सहा महिन्यात फेडण्यासाठी घाडगेंवर दबाव आणला होता. या दबावातूनच घाडगे यांनी आत्महत्या केल्याचे  तक्रारीत म्हटले आहे. फडतरेवर खासगी सावकारी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक स्मिता नवघरे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: