Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेअर बाजारावर मंदीचे सावट
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 6 (वृत्तसंस्था) : जगभरातील बाजारांचे लक्ष असलेल्या अमेरिकेतील डाऊ निर्देशांकात गेल्या दोन दिवसात झालेली 2200 अंशांची घसरण, त्यामुळे परकीय गुंतवणूकदार संस्थांनी केलेली शेअर्सची विक्री आणि युरोपसह आशियातील शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. मंगळवारी सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1250 अंशांनी घसरला तर निफ्टीही 10,500 अंशांच्या खाली घसरला. दिवसभरात होताना सेन्सेक्स थोडा वधारला असला तरी 561 अंशांच्या खालच्या पातळीवर येऊन 34,195 अंशांवर बंद झाला. निफ्टीही 168 अंशांच्या खालच्या पातळीवर येऊन 10,498 अंशांवर बंद झाला.
दरम्यान, एकीकडे शेअर बाजार कोसळत असताना दुसरीकडे सोन्याला नवी झळाळी मिळाली असून सोन्याचे दर गेल्या 14 महिन्यांत उच्चांकी स्तरावर पोहोचले. मंगळवारी सोन्याचा दर दहा ग्रॅमला 330 रुपयांनी वाढून 31 हजार 600 रुपयांवर पोहोचला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने भारतातही सोन्याला नवी झळाळी लाभली.
केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली गुंतवणुकीवर दहा टक्के कर आकारण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केल्यापासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत सुरू असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकूण तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जागतिक बाजारात शेअर्सची दणादण विक्री सुरू असल्याने भारतीय शेअर बाजारावरही त्याचा मोठा परिणाम झाला. जगभरातील बाजारांचे लक्ष असलेल्या अमेरिकेतील डाऊ निर्देशांक दोन दिवसांत तब्बल 2200 अंशांनी घसरल्याने जगभरात इक्विटी बाजारांना फटका बसला. अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदरात एक टक्का वाढ केली आहे. मात्र, व्याजदर आणखी दोन टक्क्यांनी वाढू शकतो, असे संकेत फेडरल बँकेने दिल्याने गेले दोन दिवस अमेरिकन बाजाराने आपटी खाल्ली आहे. फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग, जेफ बेजॉस, दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला. अमेरिकेतील पडझडीमुळे जपानसह आशियातील मोठ्या शेअर बाजारांमध्ये मंदीचे सावट आहे. युरोपातील शेअर बाजारातही कमालीची घसरण झाली. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात शेअर्सची  विक्री केल्याने सेन्सेक्स व निफ्टीमध्ये दिवसाच्या सुरुवातीलाच घसरण पहायला मिळाली. बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1250 अंशांनी कोसळला तर निफ्टीमध्येही 311 अंशांची घसरण झाली. मात्र, दिवसभरात शेअर बाजारात थोडी सुधारणा झाली. सेन्सेक्स 35 हजारांच्या खाली येऊन 34,195 अंशांवर बंद झाला तर निफ्टीमध्ये थोडी सुधारणा होऊन तो 10,498 अंशांवर बंद झाला. कालच्या तुलनेत सेन्सेक्सची 561 अंशांनी घसरण झाली तर निफ्टी 11 हजार अंशांच्या खाली आला. कालच्या बंदच्या तुलनेत निफ्टी 168 अंशांनी घसरला. या घसरणीचा परिणाम आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर अधिक झाला. निफ्टी आयटीमध्ये तीन टक्क्यांनी घसरण झाली तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका व फार्मा कंपन्यांच्या समभागांचे मूल्य दोन टक्क्यांनी घटले. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच द्विमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. त्यामुळे काही दिवस शेअर बाजारात अस्थिरता राहील, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: