Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डोळेगाव येथील जेसीबी चोरीचा छडा
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: re1
दोन महिन्यानंतर दोन संशयितांना अटक
5देशमुखनगर, दि. 6 : डोळेगाव, ता. सातारा येथून दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुनील शामराव जाधव (रा. निनाम, ता. सातारा) यांच्या मालकीच्या जेसीबी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात बोरगाव पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी जेसीबी ऑपरेटर सुनील व्यंकू राठोड (वय 25, रा. बदामी-शेन, गदक, कर्नाटक) आणि जाधव यांचा मेव्हणा जगदीश गोपू चव्हाण (वय 22, रा. चिखली-तोंडोली, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेला जेसीबी हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी, निनाम, ता. सातारा येथील सुनील जाधव यांच्या मालकीचा जेसीबी डोळेगाव, ता. सातारा येथून दि. 7 डिसेंबर 2017 रोजी चोरीस गेला होता. याबाबत जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अनेक दिवस झाले तरी या चोरीचा तपास लागत नसल्याने अखेर बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध ठिकाणचे सीसीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डाटा यांच्या सहाय्याने तपास केला. हे पथक शनिवारी (दि. 3 फेब्रुवारी) रोजी कर्नाटकला रवाना झाले होते. पोलिसांचा संशय जेसीबी ऑपरेटरवर असल्याने त्याच्या शोधासाठी जाधव यांचा मेव्हणा जगदीश गोपू चव्हाण (वय 22, रा. चिखली-तोंडोली, ता. कडेगाव) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याला घेऊन पोलीस पथक बदामी-शेन, गदक, कर्नाटक येथे गेले. तेथे पोलिसांनी जेसीबी ऑपरेटर सुनील व्यंकू राठोड (वय 25) याला ताब्यात घेतले.
दोघांकडे चौकशी केली असता हा जेसीबी जगदीशने चोरल्याचे स्पष्ट झाले. जगदीशला बोलते केले असता शिंदगी-गुंडापूर, ता. शहापूर, जि. यादगीर, कर्नाटक येथे जेसीबी कामाला लावल्याचे त्याने सांगितले. तेथून पोलीस पथकाने जेसीबी ताब्यात घेऊन दोन्ही संशयितांना अटक केली. सपोनि संतोष चौधरी व पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे, किरण निकम व राजू शिखरे यांनी ही कारवाई केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: