Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवाद्यांचा हॉस्पिटलवर हल्ला, एक पोलीस शहीद
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: mn4
5श्रीनगर, दि. 6 (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करणार्‍या दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील एका हॉस्पिटलवरच आज हल्ला चढविला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला आहे. हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी पकडलेला एक पाकिस्तानी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
श्रीनगरच्या एसएमएचएस हॉस्पिटलवर मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. दहशतवादी अबू हंजुला याची वैद्यकीय तपासणी करण्याकरता त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्याची कुणकूण दहशतवाद्यांना लागली. त्यामुळे हंजुलाला सोडविण्यासाठी या दहशतवाद्यांनी हॉस्पिटलवरच हल्ला चढविला. हॉस्पिटलच्या आतच या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. हंजुलानेही पोलिसांच्या हातातून रायफल हिसकावून घेत त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यात दोन पोलीस शहीद झाला आहे. दरम्यान, यावेळी हंजुला पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. उधमपूर येथील हल्ल्यात हंजुलाचा हात होता. तो पाकिस्तानचा नागरिक असून त्याला कुलगाममध्ये अटक करण्यात आली होती. दरम्यान, माजी पोलीस अधिकारी जी. डी. बख्शी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. हा अत्यंत दुर्दैवी हल्ला आहे. पाकिस्तानातून येणार्‍या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. अशा प्रकारचे अमानवी कृत्य करणारे हे माणसाच्या रूपातील जनावरे आहेत, असा संताप बख्शी यांनी व्यक्त केला. प्राथमिक माहितीनुसार आज पोलिसांकडून नावेद या पाकिस्तानी कैद्याला महाराजा हरी सिंह रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी रुग्णालयात शिरून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. याचा फायदा घेऊन नावेदने तेथून पळ काढला. त्यामागोमाग दहशतवादीही तेथून पसार झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: