Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अपघाती निधन झालेल्या पैलवानांच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: re5
औंधमधील युवक व ग्रामस्थांनी जपली माणुसकी
5औंध, दि. 6 : गेल्या महिन्यात दि. 12 जानेवारी रोजी औंधचे कुस्ती मैदान संपवून कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलाकडे निघालेल्या पाच पैलवानांवर भीषण अपघातात काळाने घाला घातल्याने अवघा महाराष्ट्र हादरला होता. या पैलवानांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी सहकार्य करणे, हे आद्यकर्तव्य समजून औंध येथील युवक व ग्रामस्थांनी 15 दिवसांत सुमारे एक लाख 25 हजार रुपयांचा निधी गोळा करून त्यातील एक लाख रुपये चार पैलवानांच्या कुटुंबीयांना आणि उर्वरित 25 हजार रुपये औंध गावचे कोतवाल मनोज भोकरे यांच्या निराधार कुटुंबीयांना देण्यात आले. यातून ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत समाजासमोर आदर्श
ठेवला आहे.
दि. 12 जानेवारीची रात्र कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलातील पाच पैलवांनासाठी काळरात्र ठरली होती. औंध येथील कुस्ती मैदान संपवून काही मित्रमंडळींकडे जेवण केल्यावर हे पैलवान कुंडलकडे परत निघाले होते. त्यांच्या जीपला वांगी गावानजीक भीषण अपघात होऊन त्यामध्ये शुभम घार्गे (सोहोली), विजय शिंदे (रामापूर), आकाश देसाई (काले), सौरभ माने(मालखेड) व अविनाश गायकवाड (फुपिरे)व जीपचालक यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरुण व होतकरू पैलवानांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. या कुटुंबीयांनी सर्वस्व पणाला लावून आपली मुले कुंडल येथे प्रशिक्षणासाठी पाठवली होती. त्यातील रामापूर येथील विजय शिंदे यांच्या कुटुंबाला 20 हजार रुपये, काले येथील आकाश देसाई, मालखेड येथील सौरभ माने आणि फुपिरे येथील अविनाश गायकवाड यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत त्या, त्या ठिकाणी जाऊन औंध येथील युवक व ग्रामस्थांनी सुपूर्त केली. दरम्यान, आकस्मिक निधन झालेले औंध गावचे कोतवाल मनोज भोकरे यांच्या निराधार पत्नीला 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
औंध येथील 15 युवक व ग्रामस्थांनी गावामध्ये फिरून दहा रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मदत गोळा करून सुमारे सव्वा लाख रुपये जमा केले. त्यासाठी त्यांनी पंधरा दिवस परिश्रम घेतले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: