Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काळोशी येथील सहा महिन्याच्या चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 :  काळोशी, ता. सातारा येथील आरोही उर्फ गौरी महेश अवघडे (वय 6 महिने) या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती.  त्यानंतर व्हिसेरा पुणे येथे पाठवला जाणार आहे. व्हिसेराच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुलीला सहा महिन्यानंतर दिला जाणारा डोस दिल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांना केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आरोहीचे वडील चालक असून आई गृहिणी आहे. आरोही सहा महिन्यांची झाल्याने सोमवारी तिला तिच्या आई व आजीने सहा महिन्यानंतर लहान मुलांना दिला जाणारा डोस देण्यासाठी आरोहीला चिंचणेर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कोडोली येथे नेले होते. डोस दिल्यानंतर तिला घरी नेण्यात आले. 
मंगळवारी सकाळपासून तिला त्रास होवू लागला. दुपारी दोनच्या सुमारास ती निपचित पडली. त्यामुळे तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात  हलवण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोहीचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाने सांगितले. अवघ्या सहा महिन्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. मोठ्या संख्येने तेथे नागरिक जमा झाले होते.
त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयातील वातावरण पाहून पोलीस व सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: