Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
न्यायालयाचा मासळी बाजार करू नका; कोर्टाने वकिलाला झापले
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांना ’न्यायालयाचा मच्छीबाजार करू नका’, अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
वकिलांमध्ये जोरदार
शाब्दिक चकमक
न्या. लोया प्रकरणी सुनावणी सुरू असताना उभय पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ही चकमक सुरू असताना काही क्षणाला दोन्ही वकिलांचे स्वर काहीसे टिपेला पोहोचले. वकिलांच्या आवाजाची पातळी पाहून न्यायालयाने सुरुवातीला सौम्य शब्दात समज दिली. मात्र, तरीही दोन्ही वकिलांचा स्वर वरच्या पट्टीत राहिलेला पाहून न्यायालय संतापले. या प्रकरणातील याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे तसेच आणखी एक याचिकाकर्त्यांचे वकील पल्लव सिसोदिया हे सुनावणी दरम्यान अनेक वेळा उच्च स्वरात वादसंवाद करताना दिसले. त्यावर न्यायाधीशांनी समज दिली. सुनावणी दरम्यान, झालेल्या चर्चेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचाही उल्लेख झाला.  सुनावणी दरम्यान बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे वकील दुष्यंत दवे यांना न्यायालयाने तीव्र शब्दात समज दिली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले, की न्यायालयात सुनावणी वेळी बोलताना आवाजाची पातळी योग्य ठेवावी. न्यायालयाचे वातावरण मच्छीबाजारासारखे करू नये. न्यायमूर्ती म्हणाले, श्रीयुत दवे आपल्याला माझे म्हणणे ऐकावेच लागेल. आपण तेव्हाच बोलू शकता जेव्हा आपली वेळ येईल.
न्यायाधीश-वकील यांच्यातही खडाजंगी
न्यायाधीशांच्या संतापावर वकील दवे म्हणाले, नाही, मी असे करणार नाही. सन्माननीय न्यायमूर्ती महोदय आपण पल्लव सिसोदिया आणि हरीश साळवे यांना या प्रकरणात व्यक्त होण्यापासून रोखायला हवे होते. आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायला हवा. यावर न्यायालयाच्या खंडपीठाने दवे यांना सांगितले, की तुम्ही आम्हाला अंतरात्म्याबाबत सांगू नका. न्यामूर्ती चंद्रचूड हे या प्रकरणाची सुनवाई करत असलेल्या मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार्‍या खंडपीठातील एक सदस्य आहेत. वकील पल्लव सिसोदिया हे महाराष्ट्रातील पक्षकार बंधुराज संभाजी लोने यांच्यावतीने सादर झाले होते. ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्या. लोया प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर चौकशीचे आदेश देण्याचा विरोध केला होता.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: