Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सेक्युलर मतांचं विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसचे एक पाऊल पुढे
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: mn1
आघाडीचा अंतिम निर्णय राहुल गांधी, शरद पवार घेणार
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : सेक्युलर मताचं विभाजन टाळून राज्यातील शिवसेना-भाजप सरकारविरुद्ध एकसंध आघाडी उघडण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच घेतील, असे दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व आमदार सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
26 फेब्रुवारीपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन व पुढच्या वर्षांत होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. पुढील वर्ष महत्त्वाचे असून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन सरकार विरुद्ध आघाडी उघडावी, असे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. नागपूर अधिवेशनाच्या वेळी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला होता. 26 जानेवारी रोजीही एकत्र येऊन संविधान मार्च काढण्यात आला. असे एकेक कार्यक्रम करण्याऐवजी समविचारी पक्षांना सोबत घेऊन सरकारविरुद्ध आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक झाली. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अर्थसंकल्प, सर्वसामान्य जनतेमध्ये असलेला रोष, आदी  मुद्द्यांवर चर्चा झाली. सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, या मताचे आम्ही आहोत. सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन या सरकारचा आम्ही सामना करणार आहोत. जे समविचारी पक्ष आमच्या सोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी तुटल्यापासून दोन पक्षात असणारी कटुता संपली काय, असा पत्रकारांनी सवाल केला असता, आमच्यात कडवटपणा नाही तर गोडवा आहे. शिवाय मोठा कोण, छोटा कोण हा वाद नसल्याचे अशोक चव्हाण व सुनील तटकरे यांनी सांगितले. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी दि. 8 फेब्रुवारी रोजी सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: