Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किरकोळ कारणावरून लष्करी जवानाचा खून
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re2
5वाई, दि. 5 : लष्करी जवान असलेल्या दोन सख्ख्या मावस भावांमध्ये दारुच्या नशेतून किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर झटापट होऊत गणेश बाळू पिसाळ (वय 26, रा. गोवेदिगर, ता. वाई) हा ठार झाल्याची घटना धोम जलाशयालगतच्या (ता. वाई) हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गोवेदिगर, ता. वाई येथील सात मित्र वेलंग येथील यात्रेनिमित्त नातेवाइकांकडे जेवणासाठी गेले होते. वेलंगला जाण्यापूर्वी ते धोम जलाशयालगत दारु पित बसले होते. यावेळी जुन्या विषयावर चर्चा सुरू झाली. त्यातून वादावादी वाढू नये म्हणून सागर पिसाळने बाकीच्या चार मित्रांना पुढे जायला सांगितले. सागर पिसाळ (वय 28), गणेश बाळू पिसाळ (वय 26, रा. गोवेदिगर) व सुनील गाढवे (रा. गंगापुरी, वाई) हे एकत्र दारु पित होते. त्यावेळी त्या चौघांना पुढे का पाठवले, असे म्हणत सागर व गणेश यांच्यात वादावादी झाली. वादावादीचे रूपांतर झटापटीत झाले. दोघेही लष्करी जवान असल्याने त्यांची झटापट वाढली. गणेशला गप्प बसण्यास सांगूनही तो गप्प बसत नाही, म्हणून सुनीलने त्याला पकडले. त्यावेळी गणेशने सुनीलच्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे सुनीलने गणेशला आणखी घट्ट पकडले तर सागरने त्याचे पाय पकडले. दारुच्या नशेत असल्याने आपण गणेशला किती जोरात आवळतोय, हे सुनील व सागरच्या लक्षात आले नाही. त्यातच गणेशची हालचाल मंदावल्याचे लक्षात आले.
त्यानंतर दोघेही त्याला वाईला ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी गणेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन येडगे, पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे व पोलीस कर्मचार्‍यांनी रात्रभर तपास करुन सागर पिसाळ व सुनील गाढवे यांना अटक केली. गणेश व सागर हे चुलतभाऊ असून लहानपणा-पासून घनिष्ठ मित्र होते. 
लष्करी भरतीसाठी त्यांनी एकत्रित सरावही केला होता. गणेश पठाणकोठ येथे सैन्यदलात कार्यरत होता तर सागर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दिल्ली येथे कार्यरत आहे. दोघे सुट्टीवर आले होते. न्यायालयाने संशयितांना दि. 8 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ तपास करत आहेत.
दरम्यान, गणेश पिसाळ याच्यावर गोवेदिगर येथे सैनिक कल्याण अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश पिसाळ हा 2012 मध्ये सैन्यात भरती झाला होता. दि. 1 जानेवारी रोजी
तो गावी सुट्टीवर आला होता. सोमवार, दि. 5 रोजी तो परत कामावर जाणार होता.  त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आईने मोलमजुरी करून दोन मुले व एका मुलीचा सांभाळ केला. बहिणीचे लग्न झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: