Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आयटीडी सिमेन्टेशन इंडिया कंपनीकडून शासनाची लाखोंची फसवणूक
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re3
5शेंद्रे, दि. 5 :  आय. टी. डी. सिमेन्टेशन इंडिया प्रा. लि., या कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजचा पुरवठा करताना महाराष्ट्र शासनाची 70 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की आय. टी. डी. कंपनी ही रिलायन्स अंडर काम करत असून नॅशनल हायवेच्या कामासाठी मुरूम, माती पुरवण्याचे काम करते. या कंपनीने भाटमरळी, ता. सातारा येथील गट नं. 502, गट नं. 477 या क्षेत्रातील माती व मुरूम उचलण्यासाठी दि. 17 जानेवारी रोजी 5000 ब्राससाठी 20 लाख भरले. 5000 ब्राससाठी दुसरा परवाना दि. 26 जानेवारी रोजी घेतला. त्यासाठी 20 लाख रुपये भरले. तहसीलदारांकडून दि. 8 व  24 जानेवारी रोजी 500 ब्रासचे दोन परवाने घेतले. असे एकूण 11 हजार ब्रास माती, मुरूम उचलण्याचे परवाने घेतले; परंतु या परवान्यांच्या आधारे 70 ते 80 लाख रुपयांंच्या वर माल उचलला. गट नं. 502 व 477 या व्यतिरिक्त दुसर्‍या बाजूच्या डोंगराकडील बाजूचा मालदेखील कंपनी विनापरवानगी उचलत आहे.
याबाबत महसूल विभागाशी संपर्क साधला असता, आम्हाला काहीही माहिती नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे तलाठी अंबोरे व मंडलाधिकार्‍यांनी दिली. ही कंपनी एका तासाला 25 ट्रक माल वाहतूक करत आहे. रोज सरासरी 800 ब्रासची वाहतूक होत आहे. सरकारी मूल्यांकनानुसार माती 160 रुपये ब्रास व मुरूम 400 रुपये ब्रास आहे. शासनाच्या मूल्यांकनाचा विचार करता या कंपनीने आतापर्यंत 70 ते 80 लाखांचा महसूल बुडवला आहे. या कंपनीने वीज प्रकल्पाचे खांब उभे असलेल्या जागासुद्धा सोडलेल्या नाहीत. हे खांब पडले तर त्याची मोठी किंमत लोकांना चुकवावी लागणार आहे.
याबाबत महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करू, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आतापर्यंत कसलीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.  ‘आंधळे दळते व कुत्रे पीठ खाते’ असा शासकीय यंत्रणेचा
कारभार असून या प्रकरणात शासकीय अधिकार्‍यांचे काही लागेबांधे आहेत का, अशी प्रतिक्रिया सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी संबंधितांनी सदर कंपनीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: