Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकच्या गोळीबारास सडेतोड उत्तर द्या
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानकडून आपल्या दिशेने करण्यात येणार्‍या गोळीबाराला फैरींमधून उत्तर द्या. गोळ्या मोजण्यापेक्षा पाकच्या सैन्याला सडेतोड उत्तर द्या, अशा स्पष्ट सूचना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लष्कराला दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसात पाकच्या कुरापती वाढल्या आहेत. चालू वर्षांतदेखील यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. या दोन्ही देशांत 2003 मध्ये झालेल्या शस्त्रसंधी करारानंतर सीमावर्ती भागातील चकमकी वाढल्या आहेत.  आगरतळा येथे आयोजित प्रचारसभेमध्ये बोलताना राजनाथसिंह यांनी हे वक्तव्य केले.
ते म्हणाले, भारताला पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण पाकनेच चिथावणी दिली तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताना गोळ्यांचा हिशेब ठेवू नका, असे स्पष्ट आदेशच मी लष्कराला दिले आहेत. आम्हाला पाकिस्तानवर प्रथम हल्ला करायचा नाही. शेजारी देशांसोबत आम्हाला शांतता आणि सौहार्द हवाच आहे; पण दुर्दैवाने पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा प्रदेश, सुरक्षा दलांवरदेखील हल्ले केले जात आहेत.
पूँछमध्ये पुन्हा गोळीबार
पाकिस्तान लष्कराने आज सलग दुसर्‍या दिवशी पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. लघू आणि स्वयंचलित शस्त्रांमधून गोळीबार करण्याबरोबरच काही तोफगोळेही डागण्यात आले. आज सकाळी अकराच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला होता, असे लष्कराच्या अधिकार्‍याने सांगितले. भारतीय लष्करानेही याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. रविवारी पाकिस्तानच्या गोळीबारात भारताने आपले चार जवान गमावले. यामध्ये कॅप्टन कपील कूंडू यांचाही समावेश होता. केवळ 23 वर्षीय कुंडू यांचा दि. 10 रोजी वाढदिवस आहे. त्यासाठी त्यांच्या घरात तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. परंतु अशाही परिस्तिथीत कपील यांच्या बहिणीने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देवून आपल्या भावाच्या बलिदानाचा बदला घ्यावा, असे आवाहन केले आहे.
आपल्याकडील क्षेपणास्त्र राजपथावरील
संचलनासाठीच आहेत काय?  शिवसेना
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यासाठी पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा वापर केला. मग आपल्याकडील क्षेपणास्त्रे केवळ राजपथावरील संचलनासाठीच आहेत काय, असा सवाल करतानाच पाकला आताच चोख प्रत्युत्तर दिले नाही तर जग भारताला नामर्द म्हणेल, असा संताप शिवसेनेने सोमवारी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. पाकिस्तान जर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असेल तर आपली क्षेपणास्त्रे केवळ दाखविण्यासाठीच आहेत काय, असा सवाल त्यांनी केला.  
आपल्याकडील क्षेपणास्त्र केवळ राजपथावर संचलनासाठी आणि लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी आहेत काय? 26 जानेवारीला दुसर्‍या देशातील राष्ट्रप्रमुखांसमोर प्रदर्शन करण्यासाठीच ही क्षेपणास्त्र आहेत काय, असा सवाल त्यांनी केला.
हे केवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन नसून हे सरळ सरळ युद्धच आहे. हा भारतावरील हल्ला आहे आणि त्याला प्रत्युत्तरही तशाच पद्धतीने दिले पाहिजे. जर तुम्ही तसे उत्तर दिले नाही तर जगात भारताला नामर्दच म्हटले जाईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील पाकच्या गोळीबारावर प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानला माफ करणार नाही. पाकिस्तानचा मूर्खपणा यातून दिसत असून त्यांना याचे परिणाम भोगावेच लागतील.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: