Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बेरोजगार असण्यापेक्षा भजी विकणे चांगले
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : ‘आम्ही केंद्रात सत्तेत आलो तेव्हा आम्हाला वारसा म्हणून खड्डेच खड्डे मिळाले. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हे खड्डे बुजविण्यात गेला,’ अशी टीका करतानाच देशातील तरुण भजी विकून कुटुंब चालवत असेल तर त्यात गैर काय? त्यांची भिकार्‍यांशी तुलना करून थट्टा करणं कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अमित शहा यांनी केला.
अमित शहा यांचे राज्यसभेतील खासदार म्हणून हे पहिले भाषण होते. पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत नरेंद्र मोदी सरकारच्या कामाचा मुक्तकंठाने गौरव केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते. आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा खूप काम करावे लागले. मागच्या सरकारने निर्माण केलेले खड्डे बुजविण्यात आमचा बराचसा वेळ गेला. त्यामुळे आमचं विश्‍लेषण करताना वेगळ्या दृष्टीने केले पाहिजे, असे शहा यांनी सांगितले. 2013 मधील देशाची स्थिती आठवा. तेव्हा देशाच्या विकासाची गती थांबली होती. देशात महिला सुरक्षित नव्हत्या. देशाचे संरक्षण करणारे जवानही सरकारच्या निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे काहीच करू शकत नव्हते, अशी टीका शहा यांनी केली.
30 वर्षात सत्तेत पूर्ण बहुमत असलेली गैरकाँग्रेसी सरकारे खूप कमी आली. आमच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. तरीही आम्ही रालोआचे सरकार स्थापन केले. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सरकार गरिबांचे सरकार असेल, हे सरकार गांधी आणि   दीनदयाल यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले होते, असेही शहा यांनी सांगितले.
यावेळी शहा यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. जनधन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जे 60 वर्षात झाले नाही ते आता कसे होईल या विचाराने मीही सांशक होतो. पण आज 31 कोटी लोकांचे बँकेत खाते आहे, असेही त्यांनी सांगितले.
तर भजी विकणे चांगले
बेरोजगार राहण्यापेक्षा तरुणांनी भजी विकणे कधीही चांगले. भजी विकणे लज्जास्पद काम नाही. त्याची भिकार्‍यांशी तुलना करू नका, असा टोला शहा यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना लगावला. भजी विकून एखादा तरुण जर मुलांचे शिक्षण करत असेल तर बिघडले कुठे?, उद्या भजी विकणार्‍यांचा मुलगाही पुढे काही तरी होईल, असे सांगतानाच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे उदाहरण दिले. चाय विकणारे मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यापूर्वी हिवाळी अधिवेशनात जीएसटीवर होणार्‍या चर्चेत शहा यांचे भाषण होणार होते. पण विरोधकांच्या गोंधळामुळे हे भाषण होऊ शकलं नव्हतं.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: