Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लग्न करणार्‍या दोघांमध्ये तिसर्‍याचा हस्तक्षेप नको : सर्वोच्च न्यायालय
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : वैवाहिक संबंधात दखल देणार्‍या खाप पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक लगावली आहे. जर दोन वयस्क (सज्ञान) व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसर्‍याने दखल देण्याची आवश्यकता नाही. अगदी कुटुंबातील लोक असो वा समाजातील लोक, कुणीही दोन वयस्कांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, खाप पंचायती संबंधी या याचिकेवर येत्या 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ’व्यक्तिगतरीत्या, सामूहिकरीत्या किंवा संघटना म्हणून कोणीही, कुणाच्या विवाहामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यांना जबरदस्तीने वेगळे करणे चुकीचे ठरेल. आम्ही इथे काही कथा लिहायला बसलो नाही आणि लग्न कशा पद्धतीने होतात हेही सांगायला बसलो नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण आहात, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीच्या वकिलाला केला. न्यायालयाला त्यांच्या हिशोबाने काम करू द्या. तुम्ही अशा जोडप्यांबाबत चिंता करू नका. ’ज्या सज्ञान जोडप्यांनी लग्न केले आहे, त्यांची आम्हाला काळजी वाटतेय, असे न्यायालयाने स्पष्ट केले.       
याच तत्त्वाने लग्न झाल्यानंतर त्यांच्यात काही वादविवाद निर्माण झाले तर न्यायालयाला देखील हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसावा. स्वार्थी न्यायव्यवस्था आणि सदोष राज्यघटना यांच्यामुळे देशाचे अपरिमित नुकसान होत आहे. धिक्कार असो
’शक्ती वाहिनी’ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात याचिका दाखल करून स्वत:ला स्वयंभू न्यायालय समजणार्‍या खाप पंचायतीसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. प्राचीन काळातील परंपरांच्या रक्षणाच्या नावावर प्रेमी युगुलांची हत्या करता येणार नाही, असे शक्ती वाहिनीने याचिकेत म्हटले होते तर आम्ही अशा प्रकारच्या हत्यांच्या विरोधात आहोत, असे खापच्या वकिलाने न्यायालयात स्पष्ट केले होते. त्यावर न्यायालयाने आम्हाला खाप पंचायतीच्या अधिकारांची चिंता नाही तर लग्न केलेल्या सज्ञान जोडप्यांची चिंता आहे. लग्न वाईट असो वा चांगले त्यापासून आपण लांबच राहिले पाहिजे, असे न्यायालयाने खाप पंचायतीला बजावलं आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: