Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोडोली येथे ट्रकच्या धडकेत वृद्ध जागीचठार
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 5 :  ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने सोमवारी सकाळी  कोडोली येथे झालेल्या अपघातात दुचाकीवरील वृद्ध जागीचठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता, की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. ठार झालेल्या वृद्धाचे ज्ञानदेव गणपती फडतरे (वय 65, रा.जिहे, ता.सातारा) असे नाव आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. अपघातानंतर तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलीस आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत दुचाकीवरील एक जण जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, कामानिमित्त  ज्ञानदेव फडतरे व त्यांचा पुतण्या दादासाहेब फडतरे  सातारा येथे आले होते. सातार्‍यातील काम झाल्यानंतर दुचाकीवरून परत गावी जाताना ते कोडोली गावच्या हद्दीत आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीच्या पाठीमागून आलेल्या ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसली. 
ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरून ज्ञानदेव फडतरे खाली पडले व त्याचवेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. हा अपघात एवढा भीषण होता, की ज्ञानदेव फडतरे जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील वाहतूक ठप्प झाली. ट्रक चालकाने ट्रक तसाच पुढे दामटला व बाजूला ट्रक लावून तो तेथून पळून गेला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. जखमी दादासाहेब फडतरे यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत करून घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: