Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अनिकेत कोथळे खून प्रकरणी सांगली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: re1
5सांगली, दि. 5 (प्रतिनिधी) :  सांगलीतील अनिकेत कोथळे प्रकरणी सीआयडीने सोमवारी सुमारे 700 पानांचे दोषारोपपत्र सांगली न्यायालयात दाखल केले. गुन्हे कबूल करण्यासाठी जबरदस्ती करताना बेदम मारहाण केल्यामुळेच पोलीस कोठडीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात जणांनी संगनमताने कट केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तब्बल 125 जणांकडे चौकशी केल्यानंतर सबळ आणि ठोस पुराव्यांसह दिलेल्या मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाचा तपास अद्यापही संपलेला नाही, असे तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
लुटमार प्रकरणी अटक केलेल्या अनिकेत कोथळे याचा तपासाच्या नावाखाली बेदम मारहाण करून पोलिसांनी कोठडीत खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन दोन वेळा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे चव्हाट्यावर आल्याने संपूर्ण पोलीस दलाला हादरा बसला होता. या प्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज  बजरंग कामटे (वय 36, रा. व्यंकटेश समृद्धी अपार्टमेंट, स्फूर्ती चौक),  हवालदार अनिलकुमार श्रीधर लाड (वय 52, यशवंतनगर), हवालदार अरुण विजय टोणे (वय 42, विश्रामबाग पोलीस लाइन), चालक राहुल शिवाजी शिंगटे (वय 32, अकुजनगर, कुपवाड रोड), कॉन्स्टेबल नसरुद्दीन बाबालाल मुल्ला (वय 31, पंढरपूर रोड पोलीस लाइन, मिरज), झीरो पोलीस झाकीर नबीलाल पट्टेवाला (वय 44, पाकिजा मसिद, गोल्डन बेकरीनजीक शंभर फुटी रोड) आणि  कामटेचा मामा बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (वय 48, सत्यविनायक अपार्टमेंट, खणभाग)  आदींना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व संशयित कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार, पश्‍चिम विभागाचे विशेष पोलीस
महानिरीक्षक सुनील रामानंद,  कोल्हापूर विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक कुलकर्णी यांनी केला. सोमवारी त्यांनी संशयित सात जणांच्या विरोधात सांगली न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भाविषा गारे यांच्या न्यायालयात तब्बल सातशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्याचबरोबर या प्रकरणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे काम पाहणार असल्याचेही कुलकर्णी यांनी न्यायालयाला सांगितले.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: