Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘तेलगू देसम’ तूर्त एनडीएसोबतच राहणार
ऐक्य समूह
Monday, February 05, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) तूर्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टीडीपीच्या बैठकीनंतर पक्षातील नेते वाय. एस. चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर येत्या चार दिवसात तोडगा काढण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2018-19 वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी काहीही न मिळाल्याने चंद्राबाबू नायडू संतप्त झाले आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनंतर नायडू यांनी नरेंद्र मोदी-अमित शहा प्रणित भाजप आघाडीला रामराम ठोकण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, आज तेलगू देसम संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर टीडीपी एनडीएसोबत राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, अर्थ-संकल्पात आंध्र प्रदेशच्या विकासासाठी निधी दिला नसल्याने नाराज झालेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिल्यानंतर अरूण जेटली यांनी यावर भाष्य केले. आम्ही आंध्र प्रदेशसाठी वेगळे पॅकेज लागू करणार आहोत. याचा अर्थसंकल्पाशी काहीही संबंध नाही. तसेच आम्ही आंध्रच्या जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करणार आहोत.
उद्धव ठाकरे-चंद्राबाबू नायडूंची
चर्चा नाही, टीडीपीचा खुलासा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देशम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणत्याच विषयावर चर्चा झाली नसल्याची माहिती आंध्र प्रदेशचे संसदीय कार्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनी दिली. टीडीपीच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून टीडीपी भाजपवर नाराज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानंतर त्यांच्याकडूनही अशाप्रकारची घोषणा केली जाऊ शकते, असे माध्यमात वृत्त येत होते. त्यातच अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद केली नसल्याची टीडीपीची भावना झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर टीडीपीची रविवारी संसदीय बैठक बोलावण्यात आली होती. तत्पूर्वीच चंद्राबाबू व ठाकरेंची चर्चा झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिध्द करण्यात आले होते.       
त्यावर चौधरी म्हणाले, केंद्र सरकारशी चर्चा केल्याप्रमाणे अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी काही तरतूद करण्यात आली नाही. त्याची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. आम्ही याबाबत केंद्र सरकारवर दबाव आणू, गरज पडली तर संसदेतही हा प्रश्‍न मांडू.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: