Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुढची किमान दहा वर्षे विरोधक सत्तेवर येणार नाहीत : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Monday, February 05, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष किंवा त्यांची आघाडी पुढची 10 ते 15 वर्षे सत्तेत येणार नाही. त्यांनी सत्तेची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेे. या दोन्ही पक्षांची अवस्था सत्तेशिवाय ‘जल बिन मछली’ अशी झाली आहे. सत्ता असताना या दोन्ही पक्षांनी शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही आणि आता हल्लाबोल यात्रा काढत फिरत आहेत, असेही ते म्हणाले.
स्वामिनाथन आयोगाचा अहवाल 2004 मध्ये आला. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना त्यावेळी या आयोगाच्या शिफारसी का लागू केल्या नाहीत, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या देवेंद्र साटम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंनी जे शिवसैनिक घडवले त्यापैकी एक शिवसैनिक म्हणजे देवेंद्र साटम आहेत, असे म्हणत एका देवेंद्रच्या मदतीला दुसरा देवेंद्र धावून आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या कारभारावर ताशेरे झाडले. भाजपच्या आधी असलेल्या आघाडी सरकारने काय दिले तर  कोंढणेचा भ्रष्टाचार दिला, जनतेला लुटण्याचे काम केले. मात्र जनतेनी त्यांना नाकारले आणि विकासाला प्राधान्य देणारे सरकार निवडले. राष्ट्रवादीचे लोक आता हल्लाबोल यात्रा काढत आहेत. त्यांनी त्याचा व्यवस्थित सराव करावा. त्यांना आता पुढे असेच करायचे आहे. कारण पुढची दहा ते पंधरा वर्षे ते सत्तेत येऊ शकणारच नाहीत, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राची जनता दयाळू आहे, कनवाळू आहे. मात्र
साडेतीन वर्षात ही जनता तुमची पापे विसरणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही महाराष्ट्रात काय काय केले आहे हे जनतेला ठाऊक आहे. राज्यातले दीन-दलित, महिला वर्ग, वंचित, शेतकरी यांना लुटण्याचे काम
तुम्ही पंधरा वर्षे केले. तुम्ही फक्त सत्ता उपभोगली आणि आता सत्ता गेल्यावर तुमची अवस्था पाण्याबाहेर तडफडत असलेल्या मासोळीसारखी झाली आहे. तुमची तडफड अशीच होणार आहे. पुढच्या पंधरा वर्षात तुमची सत्ता येणार नाही हे लक्षात ठेवा, असेही मुख्यमंत्र्यांनी
ठणकावून सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: