Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार
ऐक्य समूह
Monday, February 05, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
खा. उदयनराजेंच्या वाढदिवसाचे निमित्त; भुयारी गटर योजना, ग्रेड सेपरेटर, कास उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार
5सातारा, दि. 4 (विनोद कुलकर्णी) : सातारा शहराचे भाग्य बदलणार्‍या चार योजनांच्या कामाला वीस दिवसांनी प्रारंभ होणार आहे. कास धरणाची उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, पोवई नाक्यावर ग्रेट सेपरेटर आणि सातारा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले जाणार आहे. हा सगळा कार्यक्रम पक्षीय अथवा आघाडीचा न ठेवता जनतेचा होईल या दृष्टीनेही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्य सोहळा जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार असून त्याला तब्बल 1 लाख नागरिक उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याशिवाय पहिल्यांदाच सातार्‍यात एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे, आरपीआयचे नेते ना. रामदास आठवले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा भव्य सोहळा साकारण्यासाठी रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत पूर्ण नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
 खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस जोरदारपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रम इव्हेंट होईल, अशी खबरदारी घेण्यात आली आहे. हा कार्यक्रम पक्षीय अथवा राजकीय सोहळा होणार नाही याची खबरदारीघेण्यात आली आहे. खा.उदयनराजे यांच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या सर्वांनाच हा सोहळा आपला वाटेल अशा पध्दतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. खा.उदयनराजे यांनी आतापर्यंत तीन लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. 2018 किंवा 19 मध्ये होणारी चौथी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने हा सोहळा महत्त्वपूर्ण असणार आहे. पालिका ते पार्लमेंट अशी थीम घेवून हा सोहळा होणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व राहणार आहे. आपली संपूर्ण ताकद खा. उदयनराजे यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना दाखवून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुंबई, पुणे अथवा दिल्ली येथील व्यासपीठावरच सर्वच राजकीय पक्षांचे मोठे नेते एकत्र आलेले पहायला मिळतात, असा अनुभव आहे. मात्र सातारकरांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच सातार्‍यात एकाच व्यासपीठावर सर्व दिग्गज एकत्र आणण्याची किमया खा.उदयनराजे करणार आहेत. विशेष म्हणजे बर्‍याच दिवसांपासून सातारकरांचे लक्ष लागलेले आणि केव्हा या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार, अशी विचारणा होणार्‍या तीन प्रकल्पांची भूमिपूजने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता कास तलाव येथे कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मान्यवर तेथून सातार्‍यात दाखल होणार असून पोवई नाक्यावर ग्रेट सेपरेटर आणि भुयारी गटर योजनेच्या कामाचा शुभारंभ करणार आहे. त्यानंतर सातारा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळाही होणार आहे.
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, पवारसाहेब, उध्दव ठाकरे, ना. रामदास आठवले यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील, पाटबंधारे मंत्री ना. गिरीष महाजन,  ना. गिरीष बापट, ना. महादेव जानकर, पालकमंत्री विजय
शिवतारे, सहपालकमंत्री ना. सदाभाऊ खोत, आ. मोहनराव कदम  यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्वच राजकीय
पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने खा.उदयनराजेंची बॅटिंग आणि त्यानंतर दिग्गज नेत्यांची भाषणे सातारकरांना एकाच व्यासपीठावर ऐकायला
मिळणार आहेत.
1996 मध्ये खा. उदयनराजे यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराजय झाला होता. मात्र 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी ते विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी एक वर्षभर आधीच सगळे वातावरण वेगवेगळ्या आंदोलनाने आणि आक्रमक वक्तव्याने व्यापून टाकले होते. त्यावेळी सातार्‍यात दोन्ही राजांचा मनोमीलन पॅटर्नही होता. परिस्थिती अशी होती की खा. उदयनराजे यांच्याशिवाय लोकसभेला पर्यायच नाही. खा.उदयनराजे यांना उमेदवारी देण्यावाचून राष्ट्रवादीला पर्यायच शिल्लक नव्हता.  त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही खा. उदयनराजे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. या निवडणुकीतही त्यांनी असे डावपेच लढवले होते, की भाजप-शिवसेनेने हा मतदार संघ रिपाइंसाठी सोडला होता. निवडणुकीतील डावपेच खेळण्यात खा. उदयनराजे वाकबगार आहेत. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच यंदाही त्यांनी नियोजित वेळेच्या सव्वा वर्ष आधीच लोकसभेची तयारी सुरु केली आहे. सर्वच पक्षात त्यांचे समर्थक असून त्या सगळ्यांची मोट ते नेहमीच बांधतात. यंदाही त्यांनी वाढदिवसानिमित्त सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते एकाच व्यासपीठावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वच दरवाजे खुले असल्याचा संदेश जाणार आहे. एकुणच लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक लाख लोकांचे शक्तिप्रदर्शनही वाढदिवसाच्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी असल्याचा संदेश यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना देणार आहेत. वाढदिवसानिमित्त होणारा कार्यक्रम हा त्यांचा ट्रेलर असणार आहे. पुढच्या सव्वा वर्षात संपूर्ण चित्रपट कसा असेल याची ती एक झलक असणार आहे. खा. उदयनराजेंचे पुढच्या सव्वा वर्षाचे सगळे प्लॅनिंग तयार आहे. त्यामुळे खा. उदयनराजे यांच्यासमोर निवडणूक लढवणे वाटते तितके सोपे राहणार नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: