Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
टाकळवाडे येथे शेतमजुरांच्या घरांना शॉर्टसर्किटने आग; 8 लाखांचे नुकसान
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 2 : टाकळवाडे, ता. फलटण येथील शेतमजुरांच्या 5 घरांना शुक्रवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटने भीषण आग लागून त्यात पाचही घरे, संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे बेचिराख झाले. एका कुटुंबाची 2 करडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तहसीलदार विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून आपदग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्याचे आश्‍वासन दिले. गावकामगार तलाठी अनिलकुमार कुदळे यांनी पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. बरड पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार अतुल सोनटक्के व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून आग विझविण्याकामी ग्रामस्थांना सहकार्य केले.
दरम्यान, फलटण नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी तातडीने पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सूर्यवंशी व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून वीज पुरवठा खंडित करण्याबरोबर दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेतली.  सरपंच सौ. रेखा इवरे व त्यांचे सहकारी तसेच ग्रामसेवक एखंडे, काँग्रेसचे नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांनी आग विझविण्यासाठी मदत केली.
गेल्या 6 महिन्यांपासून या गावात वीज वितरण कंपनीचा वायरमन नाही. गावात अनेक ठिकाणी विजेचे पोल धोकादायक स्थितीत उभे आहेत. ते तातडीने काढून घेवून धोकादायक वीज वाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी टाकळवाडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे तसेच गावाला कायमस्वरूपी वायरमन देण्याची मागणीही करण्यात आली आहे. आज गावात वायरमन असता तर वीज पुरवठा तातडीने खंडित करून काही प्रमाणात होणारे नुकसान टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख राहुल देशमुख, उपप्रमुख विकास नाळे आदींनी तातडीने घटनास्थळी भेट देवून दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे.     
या आगीत मल्हारी महादेव आवटे यांचे 1 लाख 73 हजार 519 रुपये, पोपट मल्हारी आवटे यांचे 1 लाख 76 हजार 275 रुपये, ज्ञानदेव रामा मदने यांचे 1 लाख 26 हजार 500 रुपये, अकबर महंमद शेख यांचे 93 हजार रुपये, बाजीराव बाबा मदने यांचे 1 लाख 83 हजार 350 रुपये असे एकूण 7 लाख 52 हजार 644 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व पाचही कुटुंबांची घरे, संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे पूर्णत: जळून
गेले आहेत. ज्ञानदेव रामा मदने यांची 2  करडे आगीमध्ये मृत्युमुखी पडली आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचा खांबावरील ताण कमी झाल्यामुळे त्या  लोंबकळतात. त्यातून घर्षणाने शॉर्टसर्किट होते तसेच अनेक ठिकाणी फ्यूज बॉक्स उघडी असल्याने व ती कमी उंचीवर असल्याने धोकादायक असतात. हे अनेकवेळा निदर्शनास आणून देवूनही वीज वितरण कंपनी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते.
निंबळक येथे वीजवाहक तार जमिनीवर तुटून पडली व त्यामधील वीज प्रवाह सुरू असल्याने एका तरुण दाम्प्त्याचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांमधून वीज वितरण कंपनीने योग्य तो बोध घेवून आगामी काळात फलटण तालुक्यातील धोकादायक वीजवाहिन्या तसेच फ्यूज बॉक्स तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: