Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ देशाचे प्रेरणास्त्रोत बनेल
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 2 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ देशाचे प्रेरणास्त्रोत बनेल. येथे भेट देणारे तरुण-तरुणी जाताना समाज सेवेची प्रेरणा घेवून जातील, असे स्मारक उभे करु. या स्मारकासाठी आपण मंत्रालयात विशेष बैठक घेवू. गावकर्‍यांनी यासाठी विशेष पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव, ता. खंडाळा येथे नायगाव विकास आराखडा 2017-18 संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, आ. मकरंद पाटील, आ. योगेश टिळेकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवरच राज्य शासन काम करत आहे. नायगावातील कुठल्याच महिलेच्या व मुलींच्या जीवनात दुख निर्माण होणार नाही, असे काम नायगावात केले जाईल. फुले दांपत्यांचा कुठलाही विषय असो, पुणे विद्यापीठाचे नामकरण, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबतचा प्रस्ताव, भिडे वाड्याचे स्मारक असे अनेक प्रश्‍न मी विधानसभेत मांडून यशस्वीरित्या सोडवले आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. महिलांना आज समाजात मानाचे स्थान मिळाले असून त्यांच्यामुळेच श्‍वेता सिंघल यांच्यासारख्या महिला सातारच्या जिल्हाधिकारीपदी आहेत.
नायगावातील महिला 100 टक्के साक्षर झाल्या पाहिजेत. हे गाव 100 टक्के हागणदारी मुक्त करा, गावात सकारात्मकता आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. येथे फुले दांपत्याचे स्मारक उभे करताना मानवी विचारांची जोड देण्याची गरज आहे. पुस्तकांचे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्यांनी सांगितले आहे. नायगाव येथे सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील.
नायगाव हे प्रेरणास्त्रोत देणारे स्थान आहे. येथे येणार्‍या पर्यटक, अभ्यासक यांना येथून प्ररेणा घेवून जातील तसेच तरुण-तरुणी येथे आल्यावर समाज सेवेचे धडे घेवून जातील, अशा प्रकारचे स्मारक येथे उभे केले जाईल. यासाठी आमची पूर्ण शक्ती या गावाच्या पाठीशी असून गावकर्‍यांनीही सहकार्य करावे,
अशी अपक्षाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
मी नायगाव विकासासंदर्भात वित्त मंत्री यांना बैठक लावण्याची विनंती केली. या विनंतीनुसार वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नायगावात जावून बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी हे आश्‍वासन पूर्ण केले. 9 मार्च रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात नायगावच्या विकासासाठी निधी
तरतूद करावी, अशी अपेक्षा यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, नायगाव येथे देशभरातून येणार्‍या पर्यटक, अभ्यासक यांना सोयी सुविधा व प्रेरणा घेवून जाण्यासाठी नायगावसह परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. नायगाव या ठिकाणी वंचित महिलांसाठी आधार केंद्र
उभे करण्यात यावे तसेच या
महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच या ठिकाणी महिलांच्या शिक्षणासाठी एक संकुल
उभे करावे, अशीही अपेक्षा त्यांनी
यावेळी व्यक्त केली.
नायगावच्या विकास आराखड्यासाठी 9 मार्च रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात तरतूर करण्यात यावी, अशी अपेक्षा आ.  मकरंद पाटील व आ. योगेश टिळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी मान्यवरांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी संगणकीय सादीरकरणाद्वारे नायगावचा विकास आरखडा 2017-18 ची माहिती दिली.
या बैठकीला उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार विवेक जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहाय्यक अयुक्त विजय गायकवाड, गट विकास अधिकारी दीपा बापट यांच्या विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: