Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कणकेतून झालेल्या विषप्रयोगामुळे 5 जनावरे दगावली, शेतकरी हादरला
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 2 : कणकेतून 5 जनावरांवर विषप्रयोग केल्याची घटना अंगापूर तर्फ तारगाव, ता. सातारा येथे घडली आहे. विषप्रयोगामुळे पाचही जनावरे दगावली आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी हादरुन गेले आहेत.  या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंकुश एकनाथ शेडगे यांनी  तक्रार दिली असून अधिक माहिती अशी, शेडगे यांचा गावाजवळ गोठा असून यामध्ये एक म्हैस व इतर जनावरे होती. दि. 30 रोजी दुपारी चारच्या सुमारास कामे संपवून ते गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले. त्यावेळी गोठ्यात असणार्‍या एका म्हशीच्या तोंडातून फेस येत होता  आणि  ती म्हैस हातपाय झाडत असल्याचे दिसले. त्यामुळे शेडगे यांना शंका आली. त्यांनी तातडीने पशुवैद्यकास बोलावून घेतले.
डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर म्हशीला विषबाधा झाल्याचे समोर आले व काही वेळातच म्हशीचा मृत्यू झाला. डॉक्टर शेडगे यांनी गोठ्याची पाहणी केली असता गव्हाणीत थायमेट मिसळलेले कणकेचे गोळे पडलेले दिसले.  
अंगापूर तर्फ तारगाव या गावातच असणार्‍या मंगल कणसे यांच्या दोन गायींना तसेच विठ्ठल नारायण शेडगे यांच्या एका म्हशीलाही अशाच प्रकारे विष असणारे कणकेचे गोळे घालण्यात आले होते. त्यानंतर दि. 29 रोजी अनिल दत्तात्रय शेडगे यांच्या म्हशीलाही कणकेच्या गोळ्यातून थायमेट घालण्यात आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: