Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्ताधार्‍यांच्या नावाने बोंब ठोकत नविआचे कंदील आंदोलन
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
स्वच्छता अभियानाचा पैसा बगलबच्च्यांना पोसण्यासाठी वापरला, एक कोटी उधळले : मोहिते
5सातारा, दि. 2 : सातारा नगरपालिकेसमोरील  स्व. अभयसिंहराजे भोसले स्मृती उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानात असलेले दिवे बंद पडले आहेत. पालिका प्रशासनाकडे सहा महिन्यांपूर्वी नगरविकास आघाडीने दिवे लावा, उद्यानाची सुधारणा करा, अशी विनंती केली होती. मात्र पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच शहरात मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, असा आरोप करत नगरविकास आघाडीने उद्यानात सत्ताधारी साविआच्या नावाने कंदील लावून बोंब ठोकली. 
दरम्यान, स्वच्छता अभियान हे चांगले आहे.  मात्र अभियानासाठी आलेला निधी बगलबच्च्यांना पोसण्याचा धंदा सत्ताधार्‍यांनी बनवला आहे.   
अभियानाच्या नावाखाली एक कोटीचा निधी उधळण्यात आला आहे. सत्ताधार्‍यांनी साताकर नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नविआचे पक्षप्रतोद अमोल माहिते यांनी यावेळी दिला.  अमोल मोहिते म्हणाले, स्वच्छ भारत अभियान हे चांगले अभियान आहे. या अभियानाला आमचा विरोध नाही. हे अभियान राबवताना नागरिकांचा सहभाग घेतलेला नाही. परंतु अभियानाच्या नावाखाली 1 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी चालवली आहे. केवळ बगलबच्चे पोसायचे काम चालले आहे. कामांचा केवळ देखावा केला जात आहे. त्यांना खाण्यासाठी स्वच्छ भारत अभियान हे कुरण मिळाले आहे. पिशव्या अन टीशर्ट वाटणे, भिंती रंगवणे, बलून बसवल्याने स्वच्छ शहर होत नाही. सवंग लोकप्रियतेचा खटाटोप चालला आहे. बेसिक कामे करत नाहीत. गल्लीबोळात स्वच्छता अभियान आहे का?, स्पर्धेची आवश्यकता नाही. पालिकेच्या समोर असलेल्या बागेत लाईट नाही, नळ कनेक्शन होते ते बंद केले आहे. एक वर्ष पाठपुरावा करतो आहे. नगराध्यक्षांना सांगूनही काहीच होत नाही. नगराध्यक्ष म्हणतात पार्टी मीटिंगमध्ये विषय घेवून काम मार्गी लावले जाईल. त्यांच्याकडून काहीही होत नाही. वर्षभर आम्ही सहन केले, आता सहन करणार नाही. अविनाश कदम म्हणाले, सातारकर जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा सारा खटाटोप सत्ताधार्‍यांचा सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली हे सारे चालले असले तरीही त्यातून शहर किती स्वच्छ झाले अन् सातारकरांना मूलभूत सोयी सुविधा किती दिल्या गेल्या आहेत, हे साताकरांना ठावूक आहे. या उद्यानात एक वयोवृद्ध महिला आली होती. तिला लाईट नसल्याने ठेच लागून ती पडली. पालिकेच्या जवळ अशी अवस्था असेल तर सत्ताधारी नक्की करतात तरी काय?, त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
 आंदोलनात नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, स्थायी समितीचे सदस्य शेखर मोरे-पाटील, नगरसेविक शकील बागवान, नगरसेविका लीना गोरे, मनीषा काळोखे, दीपलक्षमी नाईक, माजी नगरसेवक अविनाश कदम, विजय काळोखे, राजू गोरे, शरद गायकवाड, सनी शिंदे यांच्यासह नगरविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
         
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: