Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विकासाची कामे गतीने करा : खा.उदयनराजे
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: lo2
सातारा पालिकेत तब्बल अडीच तास घेतला सर्व विभागांचा आढावा
5सातारा, दि. 2 :  सातारा शहरातील सर्व विकासाची कामे गतीने झाली पाहिजेत. कोणत्या अडचणी आहेत त्या आत्ताच सांगा. सर्व अडचणींचा निपटारा केला जाईल. मात्र कामे करताना अजिबात कमी पडू नका. सर्व कामे गतीने करा, अशा शब्दात कारभार गतिमान करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिले. दरम्यान, तब्बल अडीच तास खा.उदयनराजे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.   त्यामुळे खा. उदयनराजे जोरदारपणे पालिकेत सक्रिय झाल्याचे मानले जात आहे.
 छत्रपती शिवाजी सभागृहात  खा. उदयनराजे यांनी पालिकेच्या सर्व विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांना बोलवून घेतले.  सातारा शहरात पाणी पुरवठा करणा़र्‍या कास बंदिस्त पाइप लाइनची कामे, कास धरणाची उंची वाढवण्याचे काम, शहरातील भुयारी गटर योजनेचे काम,  आणि सोनगाव कचरा डेपोत उभारण्यात येणारा घनकचरा प्रकल्प आदी कामे कोणत्या मार्गावर आहेत याचा आढावा घेत त्यांनी ही कामे झाली पाहिजेत. कसलीही, कोणतीही अडचण आल्यास मी आहेच, पण सातारा शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. 
अग्निशमन विभागात अपुरा कर्मचारी वर्ग आहे. नवीन भरती होत नसल्याने कर्मचारी निवृत्त झाला तर त्याच्या कामाचा ताण इतर कर्मचार्‍यांवर वाढत जातो, अशा तक्रारीही यावेळी मांडल्या.  शंकर गोरे यांनी आपल्या सहकार्‍यांना विविध खात्यांतर्गत योग्य समन्वय राखण्याच्या सूचना केल्या. एखादे काम विशिष्ठ खात्याचे आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, असेही त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले. ठरावीक माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा प्रत्येक विभागाला कमी-अधिक प्रमाणात त्रास आहे. त्यांचे मूड सांभाळावे लागतात. थोडं मागं-पुढं झाले तर लगेच वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी होतात. या पोकळ तक्रारींचा ससेमिरा चुकवताना कसरत करावी लागते, अशी तक्रार अधिकार्‍यांनी यावेळी केली.   
 यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, नगरसेवक विशाल जाधव, ज्ञानेश्‍वर फरांदे, अ‍ॅड. डी. जी. बनकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांना सातारा शहरात विकासकामे करताना काही अडचणी येत असतील तर सांगा, असेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: