Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाट्यमय घडामोडीनंतर बाळू खंदारेला 6 पर्यंत पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Friday, February 02, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: lo3
दिशाभूल करून फिर्यादीकडून तक्रार नसल्याचे घेतले शपथपत्र
5सातारा, दि. 1 : खंडणी आणि सावकारीच्या गुन्ह्यात नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याला नाट्यमय घडामोडीनंतर दि. 6 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यातील फिर्यादीने यापूर्वी बाळू खंदारेविरुध्द तक्रार नसल्याचे शपत्रपथ दिले होते. हे शपथपत्र न्यायालयात सादरही करण्यात आले. मात्र त्यानंतर फिर्यादीने हे शपथपत्र माझी काही जणांनी दिशाभूल करुन घेतले आणि ते नोटरी यांच्याकडे नोंदवले होते, असे न्यायालयात सांगितले आणि त्यानंतर सगळा डावच उलटला.
सुरुची राडा प्रकरणातील दोन गुन्हे आणि खंड्या धाराशिवकरबरोबर असलेला खंडणी आणि सावकारीचा एक गुन्हा अशा तीन गुन्ह्यामध्ये बाळू खंदारे पोलिसांना हवा होता. बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास बाळू खंदारेला सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सदरबझार येथील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात पकडले होेते. त्यानंतर रात्री उशिरा त्याला खंडणी आणि सावकारीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. हा गुन्हा दि. 25 नोव्हेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात फिर्याद बाजीराव शहाजी जगदाळे (वय 40, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी दिली होती. या गुन्ह्यात खंदारे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयात बाळू खंदारेच्यावतीने अ‍ॅड. मुकुंद सारडा यांनी तब्बल एक तास जोरदार युक्तिवाद केला. सरकार पक्षाने पोलीस कोठडी मागताना सादर केलेले आठही मुद्दे अ‍ॅड. सारडा यांनी खोडून काढले.
बाळू खंदारे फेब्रुवारी 2013 आणि सप्टेंबर 2014 मध्ये इनोव्हा 101 या गाडीतून मला दमबाजी करण्यासाठी आला होता आणि त्याने दमदाटी केली होती. असे त्याने फिर्यादीत तीनवेळा सांगितलेले आहे आणि या गोष्टीकडे अ‍ॅड. सारडा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि बाळू खंदारे याने ही गाडी ऑक्टोबर 2015 मध्ये खरेदी केली आहे. त्याची आरटीओची कागदपत्रेच न्यायालयात सादर केली होती.    
त्यामुळे खंदारे हा त्या गाडीचा तक्रारीत उल्लेख केलेल्या तारखेला इनोव्हा गाडीचा मालकच नसल्याचे अ‍ॅड. सारडा यांनी पुराव्यानिशी न्यायालयात स्पष्ट मांडले होते. त्यावरुनच पोलिसांनी बाळू खंदारेचे नाव या गुन्ह्यात खोटे गोवल्याचे स्पष्ट होत आहे, असा  युक्तिवादात अ‍ॅड. सारडा यांनी सांगितले. बाळू खंदारेवर असलेल्या गुन्ह्यात तो निर्दोष सुटला असल्याचे अ‍ॅड. सारडा यांनी निकालपत्रे सादर केली. अ‍ॅड. सारडा यांच्या युक्तिवादामुळे बाळू खंदारेची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली जाईल, असेच वातावरण होते. मात्र त्याचवेळी सरकार पक्षाने फिर्यादीलाच न्यायालयात हजर केले आणि फिर्यादीने आपल्याकडून शपथपत्र काही जणांनी दिशाभूल करुन घेतले होते, असे सांगितले. त्यानंतर ते रजिस्टर पोस्टाने पोलीसठाण्यात पाठवण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे सगळेच चक्र फिरले आणि बाळू खंदारेवर डाव उलटला. न्यायालयाने त्याला 6 पर्यंत पोलीस कोठडी दिली. दरम्यान, बाजीराव जगदाळे आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी बंदोबस्तात न्यायालयात आणले होते. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: