Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगावचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे निलंबित
ऐक्य समूह
Friday, February 02, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: re2
दादासाहेब चुडाप्पा यांनी स्वीकारला पदभार
5कोरेगाव, दि. 1 : कोरेगाव पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभारी अधिकारी म्हणून करताना कामकाजामध्ये त्रुटी ठेवल्या प्रकरणी संभाजी म्हेत्रे यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी काढण्यात आले. नूतन पोलीस निरीक्षक म्हणून दादासाहेब चुडाप्पा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी दुपारीच पदभार घेतला आहे.
संभाजी म्हेत्रे यांची दि. 24 जून 2017 रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यांनी कामकाज करताना कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रसंग निर्माण झाले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत चालली होती. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी अनेकदा प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. पोलीस उपअधीक्षक कु. प्रेरणा कट्टे व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी म्हेत्रे यांच्या कामकाजातील त्रुटींवर आधारित निलंबनाचा प्रस्ताव विश्‍वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. त्या आधारे विश्‍वास नांगरे-पाटील यांनी म्हेत्रे यांना निलंबित करण्याचा आदेश काढला.
त्यांच्या जागी आलेले चुडाप्पा यापूर्वी सातारा जिल्हा विशेष शाखेत काम पाहत होते. 1993 मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झालेल्या चुडाप्पा यांनी विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवा बजावली आहे. सांगली जिल्ह्यात वाहतूक शाखेचा पदभार त्यांच्याकडे होता त्याचबरोबर महामार्ग वाहतूक सुरक्षा विभागात त्यांनी सेवा बजावली आहे.       
कोरेगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : चुडाप्पा
आपण जनतेचे सेवक असून, सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा विषय लोकसहभागातून मार्गी लावण्याचा मानस आहे. जनताभिमुख कामकाज करून कोरेगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: