Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रुईघर येथील जमिनी सरकारजमा करण्याचे आदेश
ऐक्य समूह
Thursday, February 01, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re5
लाखो रुपये दंड चुकविल्याने कारवाई
5पाचगणी, दि. 31 ः जावली महसूल विभागाने अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी कारवाई करत रुईघर (ता. महाबळेश्‍वर) येथील गट नं. 392 व 495/1/2/2  या मिळकती तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी सरकारजमा करण्याचे आदेश जारी केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की मौजे रुईघर येथे अनधिकृत गौनखनिज उत्खनन झाल्याबाबत आर. टी. आय. कार्यकर्ते आकाशबाजीराव रांजणे यांनी जिल्हा-धिकार्‍यांना तक्रार दिली होती. परंतु तत्कालीन तहसीलदार रणजित देसाई यांनी  संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे रांजणे यांनी पुन्हा जिल्हाधिकार्‍यांकडे फेर पंचनाम्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार चौकशी होऊन पंचनामे झाले. त्यानुसार रुईघर गट नं. 392 जयवंत कुदळे व कांगडे यांच्या मिळकतीवर 52 लाख 86 हजार 600 रुपये दंड ठोठावण्यात आला. या गटात अवैध उत्खनन करत असताना शेजारील घरांना धोका निर्माण झाला आहे तसेच रुईघर येथीलच गट नं. 495/1/2/2  स्काय लाइन डेव्हलपर्स चंद्रकांत तुकाराम भरेकर यांच्या मिळकतीत अनधिकृत उत्खनन केल्या प्रकरणी 13 लाख 77 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या मिळकतधारकांना वेळोवेळी दंडाची रक्कम भरण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु कायद्याचा धाक नसल्याने हे जमीनमालक कोणतीच कारवाई होणार नाही, अशा मन:स्थितीत होते. परंतु प्रशासनाला गृहीत धरणार्‍यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला व या मिळकतदारांनी कोणतीही रक्कम जमा न केल्याने जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी आज अखेर या मिळकती सरकारजमा करण्याचे आदेश पारित केले. या कारवाईमुळे अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले असून परिसरात सर्वत्र याबाबत चर्चा सुरू आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: