Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खाजगी बसची उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक; 1 जण गंभीर
ऐक्य समूह
Wednesday, January 31, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 30 : पुण्याहून कोल्हापूरकडे 32 प्रवासी घेवून निघालेल्या खाजगी बसच्या चालकाचा ताबा सुटून ही बस उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठी-मागून धडकून झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मलकापूर गावच्या हद्दीत घडली. या अपघातात ट्रॅव्हल्सच्या केबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गणपत गुजर, रा. पुणे, असे  गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात शांताप्पा पर्वताप्पा संगनळ्ळी, रा. आगरी बाह्मश्‍वरगी, जि. बेल्लारी, क्लीनर फकिराप्पा बाळाप्पा हाम्मागवड, (वय 33), रा. याटगोवेश्‍वर, जि. बेळगाव, चालक ओंकार घनशाम रॉय (वय 42), रा. अंकुश पाटील बिल्डिंग, सोनारपाडा डोंबीवली, रितेशकुमार तिमय्या (वय 26), रा. गांधीनगर धारवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत.  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळे, ता. कराड येथून कृष्णा कारखान्याकडे ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 26 के 9108) हा ट्रॉली (क्र. एम. एच. 10 डब्ल्यू 5764 व 5763) सह पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील डी मार्टसमोर आला असता मुंबईहून बंगलोरकडे निघालेल्या खासगी  प्रवासी बसने (क्र. के. ए. 42 ए 1418) उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की ट्रॉलीतील निम्मा ऊस बसच्या काचा फोडून आत गेला. या अपघातात बसच्या समोरील बाजूचा व ट्रॉलीचा चक्काचूर झाला. अपघाताची वेळ पहाटेची असल्याने बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत होते. सुदैवाने प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सपोनि. अशोक जाधव यांच्यासह कर्मचारी तसेच महामार्ग देखभाल विभागाच्या दोन्ही सेक्शनचे अधिकारी व वीस ते पंचवीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे महामार्गावरील कराड-कोल्हापूर मार्ग सुमारे 6  तास ठप्प झाला होता. यावेळी अधिकार्‍यांनी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली व जखमींना रुग्णालयात पाठवले. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून इनामदार तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: