Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती
ऐक्य समूह
Tuesday, January 30, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: na4
शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक सोमवारी रात्री झाली. या बैठकीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा, राष्ट्रवादीचे तारिक अन्वर, डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल आदी नेते सहभागी झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात अनौपचारिक चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
मुंबईत संविधान बचाव रॅली काढण्यात आली, त्यावेळी ही बैठक घेण्याचे ठरले होते. संविधान बचाव रॅलीत शरद पवार, शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी भाग घेतला होता. यापुढील बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणार आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
या बैठकीपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार समविचारी पक्षांची बैठक त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतली.    
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडण्यात आला. या अहवालावरून आणि देशापुढील प्रमुख प्रश्‍नांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधक करत आहेत. उत्तर प्रदेशातील कासगंजमधील हिंसाचाराचा मुद्दा विरोधक या अधिवेशनात उचलून धरणार, हे निश्‍चित आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: