Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

जयदेव उनाडकटला 11.5 कोटींचा ‘जॅकपॉट’
ऐक्य समूह
Monday, January 29, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: sp1
आयपीएलमधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू
5मुंबई, दि. 28 (वृत्तसंस्था) : ‘आयपीएल 2018’साठी खेळाडूंच्या लिलावाच्या दुसर्‍या दिवशी डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकटला ‘जॅकपॉट’ लागला. त्याला राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे आयपीएल लिलावात जयदेव हा यंदाचा सर्वांत महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. कालच्या बोलीत लोकेश राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब) व मनीष पांडे (सनरायझर्स हैद्राबाद) यांचा 11 कोटी रुपयांना सौदा झाला होता. या दोघांनाही जयदेवने मागे टाकले. आश्‍चर्याची बाब म्हणजे आपल्या स्फोटक फलंदाजीने आयपीएल गाजवणार्‍या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलवर पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये बोली लागली नव्हती. अखेर तिसर्‍या फेरीत तो सुदैवी ठरला. गेलला प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने दोन कोटी रुपयांना विकत घेतले.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी सलग दोन दिवसांच्या लिलाव प्रक्रियेत आठ संघांनी तब्बल 169 खेळाडू विकत घेताना तब्बल 4 अब्ज 31 कोटी 70 लाख रुपये खर्च केले. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या तर अनेकांच्या पदरी निराशा पडली. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बेन स्टोक्ससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 12 कोटी 50 लाख रुपये मोजले होते. सलग दुसर्‍या वर्षी स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला तर दुसर्‍या दिवशी राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटवर 11 कोटी 50 लाखांची बोली लावून आपल्याकडे घेतले. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रित न करता भारतीय खेळाडूंवर अधिकाधिक बोली लावल्या.
चेन्नई सुपरकिंग्जने 25 खेळाडूंचा चमू पूर्ण करताना साडेसहा कोटी रुपये खर्च केले तर सनरायझर्स हैद्राबाद, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही आपल्या खेळाडूंची संख्या 25 वर नेली. कोलकाता नाईट रायडर्स हा सर्वांत कमी खेळाडू विकत घेणारा संघ ठरला तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कमी पैसे खर्च करून 24 खेळाडूंचा चमू पूर्ण केला.
संघमालकांच्या रस्सीखेचीमुळे अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. आजच्या लिलावात मुख्यत्वे फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडूंवर बोली लागल्या. कर्नाटकच्या गौथम कृष्णाप्पाला 6 कोटी 20 लाख रुपयांना राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. त्याच्यासाठी राजस्थान आणि बंगलोर फ्रँचायझीमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. गेल्या आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून हॅट्ट्रिक घेणार्‍या अँड्र्यू टायला पंजाबने 7.2 कोटी रुपयांना विकत घेतले. अफगाणिस्तानचा 16 वर्षीय गूढ फिरकीपटू मुजीब झद्रानसाठीही पंजाब फ्रँचायझीने तब्बल 4 कोटी रुपये मोजले. त्यामुळे आयपीएलमध्ये यंदा चार अफगाण क्रिकेटपटूंवर बोली लागली. हैद्राबाद सनरायझर्स हैद्राबादने रशीद खान (9 कोटी) व मोहम्मद नबी (1 कोटी) यांना तर राजस्थान रॉयल्सने 19 वर्षीय डावखुरा फिरकीपटू झहीर खान फक्तीनला 60 रुपयांना विकत घेतले.
मुंबईकर शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. संदीप शर्माला सनरायझर्सने 3 कोटी रुपयांना, मोहम्मद सिराजला बंगलोरने 2.6 कोटी रुपयांना, शार्दुल ठाकूरला 2.6 कोटी रुपयांना चेन्नईने विकत घेतले. मोहीत शर्माला पंजाबने 2.4 कोटी रुपयांना तर वॉशिंग्टन सुंदरला आरसीबीने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. मार्टिन गप्टिल, डेल स्टेन, ऋषी धवन, मोईझेस हेन्रिकेस, कोरी अँडरसन, ट्रेव्हिस हेड, लेंडल सिमन्स, शॉन मार्श, इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयान मॉर्गन व अ‍ॅलेक्स हेल्स या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह शिवील कौशिक, इक्बाल अब्दुल्ला, जगदीश सुचित या होतकरू भारतीय क्रिकेटपटूंवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. गेल्या हंगामात आरसीबीने तब्बल 12 कोटी रुपयांची बोली लावलेल्या वेस्ट इंडियन टायमल मिल्सची यंदाची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. त्या किमतीवरही त्याचा सौदा झाला नाही.
आजच्या दुसर्‍या सत्रानंतर सर्व संघमालकांनी स्थानिक खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीवर खरेदी करण्याचा सपाटा लावला. यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी बाजी मारली. मुंबई इंडियन्सनेही काही स्थानिक खेळाडूंना आपल्याकडे खेचले. 19 वर्षांखालील संघातील फलंदाज मनजोत कालरा (20 लाख) दिल्ली डेअरडेव्हिल्स, सचिन बेबी (20 लाख) सनरायझर्स हैद्राबाद व रिंकू सिंग (80 लाख) केकेआर, या खेळाडूंवरही बोली लागल्या. 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या अष्टपैलू शिवम मवीला केकेआरने तर त्याचा संघ सहकारी अभिषेक शर्माला दिल्लीने 55 लाखांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाच्या बेन कटिंग्जला मुंबईने 2.2 कोटी रुपयांना तर डॅन ख्रिस्टियनला दिल्लीने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याशिवाय जेपी ड्युमिनी, ख्रिस जॉर्डन (प्रत्येकी 1 कोटी) यांना अनुक्रमे मुंबई इंडियन्स व सनरायझर्स यांनी विकत घेतले.
आजचा दिवस ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी चांगला ठरला. बिली स्टेनलेक (50 लाख) सनराझर्सकडे, जेसन बेहरेनडॉर्फ (1.5 कोटी) मुंबई इंडियन्सकडे तर सिडनी सिक्सर्सचा बेन ड्वार्शुईश (1.4 कोटी) किंग्ज इलेव्हन पंजाबकडे गेला. श्रीलंकेच्या दुष्मंता चमिराला 50 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. इंग्लंडचा मार्क वूडला (1.5 कोटी) चेन्नई सुपर किंग्जने तर श्रीलंकेच्या अकिला धनंजयाला (50 लाख) मुंबई इंडियन्सने विकत घेतले. विपुल शर्माला 20 लाखांमध्ये हैद्राबादने तर आदित्य तरेलाही त्याच किमतीत मुंबई इंडियन्सने विकत घेतले. टीम साऊदी (1 कोटी, आरसीबी), मिशेल जॉन्सन (2 कोटी, केकेआर), पार्थिव पटेल (1.7 कोटी, आरसीबी), नमन ओझा (1.4 कोटी, डीडी), सॅम बिलिंग्ज (1 कोटी, सीएसके), मुरली विजय (2 कोटी, सीएसके), दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी (50 लाख, सीएसके), श्रीवत्स गोस्वामी (1 कोटी, एसआरएच), अक्षदीप नाथ (1 कोटी,
किंग्ज इलेव्हन), बिरेंदर श्रान (2.2 कोटी, किंग्ज इलेव्हन), न्यूझीलंडचा मिशेल
सँटनर (50 लाख, सीएसके), प्रदीप सांगवान (1.5 कोटी, मुंबई इंडियन्स) महाराष्ट्राचा अपूर्व वानखेडे (20 लाख, केकेआर), ट्रेंट बोल्ट (2.2 कोटी, डीडी), नॅथन
कुल्टर-नाईल (2.2 कोटी, आरसीबी), विनयकुमार (1 कोटी, केकेआर), धवल कुलकर्णी (75 लाख, राजस्थान रॉयल्स), शाहबाज नदीम (3.20 कोटी, दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांचीही दुसर्‍या दिवशी
विक्री झाली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: