Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

रॉजर फेडररचे 20 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद
ऐक्य समूह
Monday, January 29, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: sp2
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मारिन सिलिचवर मात
5मेलबर्न, दि. 28 (वृत्तसंस्था) : ‘एजलेस वंडर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्या सीडेड क्रोएशियाच्या मारिन सिलिचला मॅरेथीन लढतीत 6-2, 6-7 (5/7), 6-3, 3-6, 6-1 अशा सेटस्मध्ये पराभूत करून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे सहावे विजेतेपद पटकावले. फेडररने सलग दुसर्‍यांदा ही स्पर्धा जिंकून सर्बियाच्या नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉय इमर्सन यांच्या सर्वाधिक सहा ऑस्ट्रेलियन विजेतेपदांची बरोबरी केली. फेडररने आपल्या कारकिर्दीतील 20 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही फेडररने सिलिचलाच हरवून ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळवले होते.
मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम लढतीत फेडररने पहिला, तिसरा आणि पाचवा सेट जिंकून विजेतेपद निश्‍चित केले. ग्रँड स्लॅम फायनल खेळण्याची फेडररची ही 30 वी वेळ होती. वयाची तिशी ओलांडल्यानंतर चार ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्याच्या रॉड लेव्हर यांच्या विक्रमाचीही बरोबरी केली. मेलबर्न येथे फेडररने 94 सामने जिंकले असून केवळ 13 सामने गमावले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण ग्रँड स्लॅम कारकिर्दीत 332 सामने जिंकले असून 52 सामने गमावले आहेत. फेडरर आणि सिलिच यांच्यात आतापर्यंत दहा सामने झाले असून त्यात सिलिचला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. सिलिचने 2014 मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत फेडररचा पराभव
केला होता.
अंतिम सामन्यावेळी तापमान 38 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे स्टेडियम आच्छादले गेले होते. त्यावरून आयोजकांवर टीका झाली. प्रचंड उष्मा असल्याने दोन्ही खेळाडूंची दमछाक होत होती. पहिल्या सेटमध्ये फेडररचे झंझावती फटके परतवून लावताना सिलिचच्या नाकी नऊ आले. फेडररने त्याची सर्व्हिस तीन वेळा भेदत हा सेट जिंकला. मात्र, दुसरा सेट सिलिचने टायब्रेकरपर्यंत खेचला. टायब्रेकरमध्ये सिलिचकडे दोन सेटपॉइंट होते. त्याचा लाभ उठवत त्याने सामन्यात बरोबरी साधली. फेडररने या संपूर्ण स्पर्धेत गमावलेला हा पहिलाच सेट होता. तिसर्‍या सेटमध्ये फेडररने सिलिचची सर्व्हिस पहिल्याच गेममध्ये भेदून तुफानी खेळ केला. त्याच्या धडाक्याला सिलिचकडे उत्तर नव्हते. हा सेट फेडररने अवघ्या 29 मिनिटांत जिंकला.
चौथ्या सेटमध्येही फेडररने सिलिचची सर्व्हिस पहिल्याच गेममध्ये भेदली. मात्र, सहाव्या गेममध्ये सिलिचने फेडररची सर्व्हिस भेदून सामन्यात पुनरामन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिलिचने ओघवते फटके मारून फेडररला जेरीस आणले आणि चौथा सेट जिंकला. त्यामुळे सामन्यात रंगत आली. पाचव्या सेटमध्ये फेडरर दबावाखाली वाटत होता. मात्र, त्याने सर्व अनुभव आणि कौशल्य पणाला लावून 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर स्वत:ची सर्व्हिस राखत तिसरा गेमही जिंकला. त्यानंतर सिलिचला फारशी संधी न देता फेडररने हा सेट 6-1 असा सहज जिंकत सहाव्या ऑस्ट्रेलियन विजेतेपदावर आपले नाव कोरले.
रॉजर फेडररने सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या आपल्या विक्रमात आणखी एका विजेतेपदाची भर टाकली. फेडररने आता एकूण 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली असून आपले कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांना खूप मागे टाकले आहे. फेडररनंतर राफेद नदाल दुसर्‍या स्थानावर असून त्याने 15 ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. पीट सॅम्प्रास 14 ग्रँड स्लॅम, रॉय इमर्सन आणि नोवोक जोकोविच यांच्या नावांवर प्रत्येकी 12 ग्रँड स्लॅम विजेतेपदे आहेत. अमेरिकेचे रॉड लेव्हर व स्वीडनचा बियाँ बोर्ग यांनी प्रत्येकी 11 तर अमेरिकेच्या बिल टिल्डन यांनी दहा ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: