Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपने राणेंना हातोहात फसवले
ऐक्य समूह
Monday, January 22, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: mn4
अजित पवार यांचे सरकारवर टीकास्त्र
5नांदेड, दि. 21 (वृत्तसंस्था) : राज्यातील भाजप सरकार लोकांची फसवणूक करण्यात माहीर आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही भाजपने हातोहात फसवले, अशी टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राणेंची अवस्था ‘आगीतून उठून फुफाट्यात गेलो’ अशी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल यात्रा’ मराठवाड्यात सुरू आहे. ही यात्रा आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पोहोचली. तेथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी राणेंची खिल्ली उडवत भाजपवर निशाणा साधला.
भाजपने नारायण राणेंना मंत्रिपदाचे गाजर दाखवले. या सरकारने राज्यातील जनता, शेतकरी यांनाही गाजर दाखवले आहे. त्यामुळे भाजपचे निवडणूक चिन्ह बदलून गाजर ठेवले पाहिजे, असा टोमणाही अजित पवार यांनी मारला. या सरकारने फक्त लोकांच्या कानाला बर्‍या वाटतील अशा घोषणा दिल्या. निर्लज्ज आणि अकार्यक्षम सरकार पायउतार झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
बेळगाव येथील कार्यक्रमात कन्नड गाणे म्हणणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील   यांच्याही राजीनाम्याची मागणी पवार यांनी केली. बेळगाव येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील कन्नडमध्ये गाणे म्हणतात. सीमा प्रश्‍न एवढ्या वर्षांपासून चिघळला असल्याचे माहिती असूनही चंद्रकांत पाटील यांनी केलेले वर्तन निषेधार्ह आहे. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचाही त्यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. जानकरांना त्यांच्या खात्यातले काहीही कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांचे भव्य स्वागत झाले. हे स्वागत म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. 2019 मध्ये जनता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वागत करेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आहे. राज्यात आता विचारांची लाट आहे. 2014 मध्ये फसवी लाट होती. महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारे सरकार उलथवून टाकण्याचे बळ आम्हाला दे, असे साकडे आम्ही माहूरच्या रेणुकामातेला घातल्याचेही तटकरे म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: