Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यंदाच्या वर्षात भारत-चिनी अर्थव्यवस्थेला मागे टाकणार
ऐक्य समूह
Monday, January 22, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: na4
सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटच्या अहवालातील अंदाज
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : जगभरात वेगाने विकास करणार्‍या अर्थव्यवस्थांचा विचार करता भारत 2018 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणार असल्याचे सँक्टम वेल्थ मॅनेजमेंट या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, यावर्षी भारतीय भांडवली बाजार जगातील पाचवा सर्वात मोठा भांडवली बाजार होणार आहे. जगभरातील देश अपुर्‍या सुधारणा आणि आर्थिक संकटांशी सामना करत असतील, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जलदगतीने पुढे झेपावत असेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या अहवालानुसार, ज्यावेळी जगातील विकसित अर्थव्यवस्थांचा विकासदर 2 ते 3 टक्क्यांपर्यंत रेंगाळत असेल त्यावेळी भारताचे लक्ष विकासदर 7.5 टक्क्यांवर पोहोचण्यावर केंद्रित झालेले असेल. या व्यतिरिक्त इतर विकसनशील देशांच्या तुलनेतही भारतीय अर्थव्यवस्था पुढेच असणार आहे. विशेषत: चीनच्या आर्थिक विकासदराची गती धीमी झालेली असेल.
भारतीय भांडवली बाजारात इक्विटीच्या माध्यमातून मिळणारा परतावा 6 ते 8 टक्क्यांपर्यंत असेल. असा परतावा निश्‍चित उत्पन्नातून मिळणे शक्य असते. तथापि, भारतात महागाई वाढली किंवा किमती वाढल्या तर त्याचा परिणाम शेअर बाजाराच्या कामगिरीवर होईल, असेही या अहवालात म्हटले आहे. यावर्षी शेअर बाजारात वेग पाहायला मिळू शकतो. ‘निफ्टी50’ने जलदगतीने उसळी घेतली आहे. सध्या निफ्टी 10,490 ते 10,580 अंकांच्या पातळीवर आहे. या वर्षीच्या शेवटापर्यंत निफ्टी 11,200 ते 11,500 अंकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी शक्यताही अहवालात वर्तविण्यात आली आहे.
शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. ते बाजारातील किमती ठरवत आहेत, हा मोठा घटक आहे. देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी 15.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे समभाग खरेदी केले आहेत. त्याउलट 2017 मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक केवळ 8 अब्ज डॉलर्स होती.
‘आधार’, नोटाबंदी, जीएसटी, जनधन योजना यामुळे भारतात सर्वसमावेशक पायाभूत संरचना निर्माण होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा सध्याचा वेग पाहता गुंतवणूकदारांना अनेक पर्यायांमधून योग्य पर्यायांचा विचार गुंतवणुकीसाठी करावा लागत आहे, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: