Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दावोसमध्ये मोदी-अब्बासी चर्चा नाही
ऐक्य समूह
Saturday, January 20, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : दावोस येथे पुढील आठवड्यात होणार्‍या ‘जागतिक आर्थिक मंच’ परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांच्यात द्विपक्षीय चर्चेची कोणतीही योजना नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (आर्थिक संबंध) विजय गोखले यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
‘जागतिक आर्थिक मंच’ची वार्षिक परिषद 22 जानेवारीपासून दावोस येथे सुरू होत आहे. या परिषदेत 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण होणार आहे. या परिषदेत पाकचे पंतप्रधान अब्बासी हेदेखील सहभागी होणार आहेत. मात्र, या परिषदेत भारत आणि पाकिस्तानी पंतप्रधानांच्या द्विपक्षीय चर्चेची शक्यता गोखले यांनी फेटाळून लावली. या परिषदेत मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार का, या प्रश्‍नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. हे दोघेही एकाच दिवशी या  परिषदेत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दावोस येथील या परिषदेत मोदी प्रथमच सहभागी होणार आहेत. 1997 साली तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे या परिषदेस उपस्थित राहिले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: