Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चकमकीत ठार मारण्याचा कट होता : तोगडिया
ऐक्य समूह
Wednesday, January 17, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: mn3
तोगडियांनी बनाव रचल्याचा पोलिसांचा दावा
5अहमदाबाद, दि. 16 (वृत्तसंस्था) : हिंदू ऐक्यासाठी काम करत असल्याने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून पोलिसांनी आपल्याला चकमकीत ठार मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.  मात्र, तोगडिया यांच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचण्यात आला होता, असा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. तोगडिया यांनी आपल्या गाडीचा चालक आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील डॉक्टराच्या मदतीनेआपल्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता. ही माहिती सीसीटीव्ही फुटेज आणि फोन कॉलच्या रेकॉर्डवरून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सायंकाळी सांगितले.
हिंदू ऐक्यासाठी काम करत असल्याने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून पोलिसांनी आपल्याला चकमकीत ठार करण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप तोगडिया यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत केला.  
सोमवारी सकाळपासून बेपत्ता झालेले तोगडिया सायंकाळी बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तदाब कमी झाल्याने ते बेशुद्ध पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, सुरक्षारक्षक न घेता ते कुठे जात होते, हे स्पष्ट झाले नव्हते. त्याबद्दलची माहिती तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जुनी प्रकरणे काढून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजस्थान आणि गुजरातचे पोलीस मला अटक करण्यासाठी येत होते. त्यामुळे मी घरातून तडक बाहेर पडलो. मी मृत्यूला भीत नाही. मात्र, काही अघटित घडल्यास देशात वाईट परिस्थिती निर्माण होईल, या काळजीने मी निघालो होतो, असे तोगडिया यांनी सांगितले. स्वतःच जयपूरला न्यायालयापुढे हजर व्हायचे असे ठरवले. त्यामुळे मी विमानतळाकडे  निघाले. पोलिसांना चकवा देण्यासाठी मी तोंड झाकले होते. या प्रवासात मला अचानक खूप घाम आला. मी कधी कोसळलो तेही कळले नाही. शुद्धीवर आलो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये असल्याचे कळले, असेही त्यांनी सांगितले. राजस्थान किंवा गुजरात पोलिसांबद्दल माझी तक्रार नाही. त्यांनी राजकीय दबावाखाली येऊ नये. राम मंदिर, गोरक्षा, शेतकरी आणि युवकांसाठी मी कायम लढत राहीन. मी कधीही न्यायव्यवस्थेचा अवमान केला नाही. मी गुन्हेगार नाही. त्यामुळे डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर जयपूरला न्यायालयापुढे शरण जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, तोगडिया यांचे आरोप गुजरात पोलिसांनी सपशेल फेटाळले आहेत. तोगडिया यांनी स्वत:च्या बेपत्ता होण्याचा बनाव आपला चालक आणि रुग्णालयाच्या डॉक्टराच्या मदतीने रचला. तोगडिया यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता आपले कार्यालय सोडले. त्यानंतर ते घनश्याम चरणदास या आपल्या सहकार्‍याच्याघरी पोहोचले. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. त्यांनी स्वत:चा मोबाईल बंद केला आणि चालकाच्या मोबाईलवरून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांनी आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयातील कर्मचार्‍यांना एका अतिमहत्त्वाच्या रुग्णाच्या सेवेसाठी सज्ज राहण्याची सूचना केली होती, असे अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त जे. के. भट्ट यांनी सांगितले.
दरम्यान, तोगडिया यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने तोगडियांची बाजू घेतली आहे. तोगडियांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा हे कट रचत असल्याचा आरोप त्याने केला. हार्दिकनंतर काँग्रेसही तोगडियांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. मी मुख्यमंत्री असताना तोगडिया यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आता त्यांच्या विचारांचा पक्ष सत्तेत आहे. असे असताना त्यांच्या जीविताला धोका असेल तर सामान्य माणसांचे काय, असा प्रश्‍न काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: