Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सर्वोच्च न्यायालयातील पेचप्रसंग संपुष्टात
ऐक्य समूह
Tuesday, January 16, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: na4
बार कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा
5नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कारभाराविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात उद्भवलेला पेचप्रसंग अखेर सोमवारी संपुष्टात आल्याचा निर्वाळा बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिला आहे. न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात उठाव करणारे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्‍वर, न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ व न्या. रंजन गोगोई यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सर्वोच्च न्यायालयात कामकाज केले.
दरम्यान, सर्वोच्च न्याया-लयातील कामकाज नेहमीपेक्षा नऊ मिनिटे उशिरा सुरू झाले. आम्ही सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील 15 न्यायाधीशांची भेट घेऊन चर्चा केली होती. आता चार वरिष्ठ न्यायाधीशांचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशी असलेले मतभेद मिटले आहेत.
सरन्यायाधीश आणि या चारही वरिष्ठ न्यायाधीशांनी आज आपले कामकाज सुरू केले. त्यामुळे हा पेचप्रसंग मिटला असून उठाव करणार्‍या चारही वरिष्ठ न्यायाधीशांवर कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. ते सर्व जण प्रामाणिक आणि सचोटीचे न्यायाधीश आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्गत मामला होता. या घटनेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी करू नये, असे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीही आज सर्वोच्च न्यायालयात कामकाज केले. मात्र, चार वरिष्ठ न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे उद्भवलेल्या वादावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. चार न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्यापासून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांच्याशी कोणताही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही समजते. सर्वोच्च न्यायालयातील निर्णय घेणारी न्यायाधीशांची कॉलेजियम ही सर्वोच्च समिती आहे. या न्यायाधीशवृंदात सरन्यायाधीश दीपक मिश्रा व या चारही वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश आहे.   
त्यामुळे न्या. मिश्रा हे या चारही न्यायाधीशांशी चर्चा करतील, असे वृत्त होते. मात्र, न्या. मिश्रा यांच्या निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रविवारी सायंकाळपर्यंत असा कोणताही प्रयत्न केला नव्हता. न्या. मिश्रा यांनी रविवारी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाची आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष विकाससिंग यांची भेट घेतली होती. त्यावेळी हा पेचप्रसंग लवकरच संपुष्टात आणण्याची ग्वाही न्या. मिश्रा यांनी दिली होती.
चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधात उठाव करताना शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे न्यायपालिकेत सर्व काही ठीक नसल्याची चर्चा देशात सुरू झाली होती. मात्र, आता या वादावर पडदा पडला आहे. चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने यावर उघडपणे बोलणे टाळले होते. हे प्रकरण न्यायपालिकेतील अंतर्गत असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमध्ये असलेले मतभेद गंभीर असल्याचे मत व्यक्त केले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: