Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवाद रोखण्यासाठी पाकवर दबाव वाढवणे आवश्यक : लष्करप्रमुख
ऐक्य समूह
Monday, January 15, 2018 AT 11:43 AM (IST)
Tags: na6
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवून शांतता स्थापित करण्यासाठी लष्कराच्या मोहिमा सुरू राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राजकीय पुढाकारही आवश्यक आहे. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवण्याची आवश्यकता आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र दलांच्या सध्याच्या कामगिरीवर बोलताना लष्करप्रमुख रावत म्हणाले, सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने कारवाई करताना जुन्या डावपेचांवर अवलंबून राहून उपयोग नाही. त्यासाठी नवी रणनीती आणि युद्धनीती विकसीत करण्याची गरज आहे. वर्षभरापूर्वी असलेल्या परिस्थितीत आता थोडा फरक पडला आहे. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवणे गरजेचे आहे. दहशतवाद संपवण्यासाठी लष्कराने आक्रमक व्हायला हवे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाया सुरुच राहतील. त्याच वेळी तेथील परिस्थिती काबूत आणण्यासाठी राजकीय व इतर तोडगे काढण्याचीही गरज आहे. लष्कर आणि राजकीय नेतृत्वाने हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ शांतता प्रस्थापित करता येईल. लष्करप्रमुख रावत यांनी काही दिवसांपूर्वीही चीन आणि पाकिस्तानच्या घुसखोरीसंबंधी खडे बोल सुनावले होते.
राजकीय चर्चा व अन्य उपाय महत्त्वाचे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सर्व पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी सरकारने  इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख दिनेश्‍वर शर्मा यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली होती. सरकारकडून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती काश्मीरमधील लोकांपुढे सरकारचे म्हणणे मांडेल आणि लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्या राजकीय नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. आपल्याला नेहमी सध्याच्या
परिस्थितीचा विचार करायला हवा आणि पुढे जायला हवे, असेही रावत यांनी स्पष्ट केले.
काश्मीर प्रश्‍न सोडवण्याच्या मार्गातील लष्कर हा केवळ एक भाग आहे. दहशतवाद्यांना रोखणे आणि कट्टरपंथीयांच्या मार्गावर निघालेल्या लोकांना शांततेच्या मार्गावर आणणे, हा लष्कराचा उद्देश आहे. काही स्थानिक तरुणांना कट्टरवादाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. काही जण दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होत आहेत. या कारवाया रोखल्या पाहिजेत. त्याचबरोबर पाकिस्तानकडून
आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनास जोरदार प्रत्युत्तर देत राहणे आवश्यक आहे. मी लष्करप्रमुख झाल्यापासून काश्मीरमधील परिस्थितीत किंचित बदल झालेला आहे. मात्र, त्यामुळे अतिआत्मविश्‍वास बाळगणे आणि अल्पसंतुष्ट राहणे धोकादायक आहे. कारण सीमेपलीकडून घुसखोरी यापुढेही सुरू राहील, असे रावत म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: