Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘इस्रो’ची शतकी कामगिरी भारताचा शंभरावा उपग्रह अंतराळात
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: na1
5श्रीहरिकोटा, दि. 12 (वृत्तसंस्था) :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी नवा इतिहास रचला. ‘इस्रो’चे पीएसएलव्ही सी- 40 हे प्रक्षेपक 31 उपग्रहांसह अंतराळात झेपावले. त्यामध्ये तीन भारतीय तर 28 विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. या मोहिमेद्वारे ‘इस्रो’ने भारताचा शंभरावा उपग्रह अवकाशात सोडला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. या मोहिमेत ‘कार्टोसॅट-2’ या मालिकेतील उपग्रहाचाही समावेश आहे.
‘पीएसएलव्ही सी- 40’ हा प्रक्षेपक 31 उपग्रहांसह शुक्रवारी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी अवकाशात झेपावला. यामध्ये 31 उपग्रहांमध्ये यात ‘कार्टोसॅट-2’ या मालिकेतील सातव्या उपग्रहांसह भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य देशांचे 29 उपग्रहदेखील इस्रोने प्रक्षेपित केले. अंतराळातील भारताचा डोळा म्हणून ‘कार्टोसॅट-2’ उपग्रहाकडे पाहिले जाते. पृथ्वीवरच्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी हा उपग्रह महत्त्वाचा आहे.     
या उपग्रहात शत्रूराष्ट्रांवर टेहळणी करणारी यंत्रणा असल्याने हा उपग्रह देशाच्या संरक्षण दलांसाठीही उपयुक्त आहे. याशिवाय फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, अमेरिका, दक्षिण कोरिया, युरोप या देशांचे उपग्रहदेखील अवकाशात सोडण्यात आले. अमेरिकेचे सर्वाधिक 19. दक्षिण कोरियाचे पाच, फिनलँड, कॅनडा या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. ‘पीएसएलव्ही सी- 40’ या प्रक्षेपकाचे हे 42 वे उड्डाण होते.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इस्रोला अपयशाचा सामना करावा लागला होता. दिशादर्शक उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहीम फत्ते होऊ शकली नव्हती. त्यानंतर इस्रोची ही पहिलीच मोहीम होती. 2018 मधील ही पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने ‘इस्रो’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. इस्रोने 1999 पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. 2016 मध्ये इस्रोने इतर देशांचे 22 उपग्रह प्रक्षेपित केले होते. फेब्रुवारी 2017 मध्ये इस्रोने एकाच वेळी सात देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा विक्रम मोडीत काढला होता. या आधी रशियाने एकाच वेळी 37 उपग्रह अवकाशात सोडले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: