Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाचगणीत तिघांवर खंडणीचा गुन्हा,एकाला अटक
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: re5
5पाचगणी, दि. 12 : येथील वंडरवूड हॉटेलमधील भाडेकरू करार संपूनही बाहेर न निघता उलट बाहेर निघण्यासाठी 70 लाख रुपये द्या अन्यथा तुमचे काही खरे नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी पुणे व पनवेलच्या तिघांविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात दमदाटी व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकाला पाचगणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लियाकत जब्बार शेख, वय 59 (रा. प्लॉट नं.240 होमी व्हीला पाचगणी) यांनी वंडरवूड हॉटेलची मुदत संपून ताबा न दिल्याने फसवणूक केल्याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 1 एप्रिल 2016 पासून आजपर्यंत माझी व माझ्या पत्नीची मिळकत नं.240 मध्ये सचिन गजानन देशपांडे (रा. श्रीरंग विहार, यशवंत-नगर, भालेराव कॉलनी, तळेगाव दाभाडे पुणे), रंजन सिपाही मलाणी व बिना रंजन सिपाही मलाणी (दोघेही रा. प्लॉट नं. 204, संस्कार को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सेक्टर 12, खांदा कॉलनी, न्यू पनवेल) यांनी आपसात संगनमताने कट करून वंडरवूड रिसॉर्ट व किचनचे आणि लिव्ह अँड लायसन्सचे कराराप्रमाणे न वागता कराराची मुदत संपूनही मिळकतीचा ताबा न देता, कराराप्रमाणे भाडे न देता आमची 30 लाख रुपयांची फसवणूक केली. या शिवाय मिळकतीतून बाहेर निघण्यासाठी 70 लाख रुपयांची मागणी करून ती न दिल्यास तुमचे काही खरे नाही, जीवाला मुकावे लागेल, आम्ही काय करू ते तुम्हाला थांगपत्ता लागू देणार नाही. हॉटेलमधून बाहेरही जाणार नाही. तुम्हाला जे काय करायचे ते करा, अशी धमकी देऊन आम्हाला आमच्या मालकीच्या मिळकतीत येण्यास प्रतिबंध करून शिवीगाळ, दमदाटी केली. यावरून पाचगणी पोलिसानी देशपांडेसह तिघांवर कलम 389, 385, 420, 447, 448, 451, 341, 406, 120, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि. तृप्ती सोनावणे व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: