Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाना पटोले यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: mn3
आमदार आशिष देशमुखांचे बंडाचे एक पाऊल पुढे
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) :पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करून खासदारकी व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देणार्‍या नाना पटोले यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांची ‘घरवापसी’ झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. दुसरीकडे बंडाचे निशाण फडकवून पक्षाला आव्हान देणारे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी आज आपल्या टीकेची धार वाढवत एक पाऊल पुढे टाकले आहे.
सर्वसाधारणपणे राजकारणातील मंडळींचा सत्तेकडे ओढा असतो. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू असताना भंडार्‍याचे खासदार नाना पटोले यांनी बंडाचे निशाण उभारले होते. अखेर डिसेंबरमध्ये त्यांनी भाजप सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा दिला होता. आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल त्यांनी मौन बाळगले होते. मात्र, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती. भाजपला रामराम केल्यानंतर पटोले यांनी 4 जानेवारीलाच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; पण याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पटोलेंच्या पक्ष-प्रवेशाची माहिती देण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची  दिल्लीत भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात पटोले यांनी 2009 साली अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश आले नाही. 
नंतर ते भाजपमध्ये गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रफुल्ल पटेलांचा पराभव केला. मात्र, पक्षाकडून मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. केंद्र व राज्य सरकारवर टीका करून अनेकदा त्यांनी नाराजी व्यक्त केली तरी त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर राजीनामा देऊन ते स्वगृही परतले आहेत. आपल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक लढवण्यास ते फारसे उत्सुक नाहीत. भविष्यात राज्याच्या राजकारणातच काम करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण जनता नाराज : आशिष देशमुख
नाना पटोले यांच्या पाठोपाठ विदर्भातील भाजप आमदार आशिष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत वेगळी वाट पत्करली आहे. स्वतंत्र विदर्भ व विदर्भाच्या विकासाचा मुद्दा घेऊन 62 मतदारसंघांत आत्मबळ यात्रा काढण्याची घोषणा देशमुख यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्षात असताना त्यांनी तब्बल सात वेळा स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव विधानसभेत आणला होता. निवडणुकीतही स्वतंत्र विदर्भाची घोषणा भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, सत्ता आल्यावर हा विषय मागे पडल्याने त्याची आठवण करून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनाच्या काळात पत्र पाठवले होते; परंतु त्यावर कोणतेही उत्तर आले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
राज्यात गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विदर्भात उद्योग आणण्याच्या अनुषंगाने उद्योजकांसोबत सामंज्यस करार करण्यात आले. मात्र, त्यातील एकही उद्योग विदर्भात प्रत्यक्षात सुरू झाला नसल्याचा आरोप करत बेरोजगारीमुळे तरुणांवर आत्महत्येची वेळ येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रश्‍न सुटत नसल्याने ग्रामीण भागात, विशेषतः शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. आत्मबळ यात्रेच्या निमित्ताने
विदर्भातील 62 मतदारसंघांत पोहोचणार आहे. विदर्भात
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडेही या यात्रेच्या निमित्ताने लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: