Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आनेवाडी टोल नाक्यावर इनोव्हा गाडीतून 29 लाख 72 हजारांची रोकड जप्त
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re1
भुईंज पोलिसांची कारवाई
5भुईंज, दि. 10 : कराडहून पुण्याकडे इनोव्हा ( क्र. एम. एच. 04 एफबी 0008) गाडीतून मंगळवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान बेहिशेबी मोठी रक्कम घेऊन जात असल्याची खबर भुईंज पोलिसांना मिळताच आनेवाडी टोल नाक्यावर सायंकाळच्या सुमारास ही गाडी येताच ती तपासासाठी भुईंज पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आली. गाडीची तपासणी केली असता एका उशीत निळ्या कापडात 29 लाख 72 हजार रुपये आढळून आले. या प्रकरणी भुईंज पोलिसांनी विनीत केशवचंद उपाध्याय (रा.मीरारोड, मुंबई) व सुरज राकेश चोबे (नालासोपारा, मुंबई) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर भुईंज पोलिसांनी कोल्हापूर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना पाचारण करून ही रक्कम त्यांच्या ताब्यात दिली. सपोनि. बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी ही गाडी पकडली.
दरम्यान, भुईंज पोलिसांनी महामार्गावरील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले आहे. एका वर्षात टोलनाका ते खंबाटकी बोगदा दरम्यान अवैधरीत्या रोकड नेत असलेल्या खासगी व्हॉल्वो बस तसेच  खासगी  कार  यांची वेळोवेळी तपासणी करून कोट्यवधी रुपयांची रोकड हस्तगत करून ती शासन दरबारी जमा केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत भुईंज पोलीस स्टेशनचे हवालदार बापूराव धायगुडे, फडतरे़, आवळे आदींनी सहभाग घेतला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: