Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी बारा जणांना अटक
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 9 (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी आठवडाभरानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी सणसवाडी, भीमा कोरेगाव आणि कोंढापुरी या भागातून 12 जणांना अटक केली आहे. संशयितांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने जमले होते. या दरम्यान, समाजकंटकांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. हिंसाचाराच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी महाराष्ट्र बंद आंदोलन केले होते. या घटनेला एक आठवडा झाला असताना आता पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी 12 जणांना अटक केली असून त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संशयितांची चौकशी करून दगडफेकीचे कारण आणि जमावाला चिथावणी देण्यात आली होती का, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतील. संशयितांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. या भागात सध्या शांतता असली तरी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संशयितांचा तपशील देण्यात आलेला नाही.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे अहवाल दिला. दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे. जवळपास 130 वाहनांची जाळपोळ झाल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले होते.
अ‍ॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा
दरम्यान, भीमा-कोरेगाव हिंसाचारात राहुल फटांगळे या तरुणाचा बळी गेला. राहुलला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने या संबंधीच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी मागणी राहुलचा मावसभाऊ तेजस धावडे याने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुणे येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तेजस धावडेने ही मागणी केली. पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, तुषार काकडे यांची उपस्थिती होती.
भीमा-कोरेगाव हिंसाचारात 1 जानेवारीला राहुलचा मृत्यू झाला. या घटनेला बुधवारी 10 दिवस होत आहे. यानिमित्त मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यात तथ्य नाही, असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. बुधवारी कान्हूर मेंसाई येथे शोकसभा घेण्यात येणार आहे, असेही त्याने सांगितले. भीमा-कोरेगाव आणि शेजारच्या गावांमध्ये झालेल्या हिंसाचारात गावकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. हे नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे. त्याची फक्त घोषणा न करता बाँडवर लिहून द्यावे, अशी मागणी धावडे याने केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: