Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदी सरकारकडून लोकशाही, राज्यघटनेला धोका
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: na5
गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवाणीची टीका
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून देशाची लोकशाही आणि राज्यघटना यांना मोठा धोका आहे, अशी टीका गुजरातमधील दलित नेता व नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली आहे. दलितांवरील अत्याचारांवर मोदी मौन बाळगून आहेत. महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर त्यांनी आता मौन सोडून काही तरी बोलावे, अशी मागणीही त्याने केली आहे.
दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिग्नेश मेवाणी आणि त्यांच्या समर्थकांनी दिल्लीच्या संसद मार्गावर ‘युवा हुंकार’ सभा घेतली. या सभेला परवानगी नाकारणे, हे ‘गुजरात मॉडेल’चे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका त्याने केली.
आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहोत तरीही सरकार आम्हाला लक्ष्य करत आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीलाही बोलू दिले जात नाही तर हे निश्‍चितच ‘गुजरात मॉडेल’ आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता हे सर्व पहात आहे. ‘भीमसेना’ या दलित संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुक्तता करावी, राज्यघटनेची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि युवकांसाठी दोन कोटी रोजगारनिर्मिती करावी, अशा आमच्या साध्या मागण्या आहेत. मात्र, ही सभा रोखणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मेवाणी म्हणाला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात विधान-सभा निवडणुकीच्या प्रचारात प्रेमाचे राजकारण करण्यावर भर दिला होता. मीदेखीलतिरस्काराच्या राजकारणापेक्षा प्रेमाचे राजकारण आणि घटनेतील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. माझा एकात्मतेच्या राजकारणावर विश्‍वास आहे.      
माझा विश्‍वास प्रेमाच्या राजकारणावर असून ‘लव्ह जिहाद’वर नाही. अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि मी गुजरातमध्ये भाजपचा अहंकार चिरडल्याने आम्हाला लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्याने केला. मोदीजी, मीसुद्धा गुजराती आहे आणि आमदारसुद्धा आहे. गुजरातमधील भ्रष्टाचाराच्या सर्व फायली उघड करणार आहे, असा इशाराही त्याने दिला.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांचा दाखला देत दिल्ली पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र, जिग्नेश आणि त्याच्या समर्थकांनी पोलिसांचा विरोध डावलून सभा घेतली. या सभेला मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिग्नेश समर्थक आणि उत्तर प्रदेशमधील भीमसेनेचे समर्थक सभेस उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: