Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पत्रकाराऐवजी ‘यूआयडीएआय’च्या अधिकार्‍यांना अटक करा
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: na4
‘जागल्या’ एडवर्ड स्नोडेनची भारत सरकारवर टीका
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) :‘आधार’ची माहिती 500 रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणार्‍या ‘द ट्रिब्युन’च्या पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून अमेरिकन गुप्तचर संस्थेचा माजी हेर आणि अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या माहितीचा भांडाफोड करणारा ‘जागल्या’ एडवर्ड स्नोडेनने मोदी सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांऐवजी ही माहिती फोडणार्‍या आधार प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना अटक करावी, असे स्नोडेनने म्हटले आहे. भारत सरकार आपल्याच नागरिकांच्या खाजगीपणाचा सर्वनाश करत आहे, अशी टीकाही स्नोडेनने केली आहे.
‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने ‘आधार’ची माहिती 500 रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त दिले होते. ‘आधार’चा माहितीसंच उघड झाल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) ‘द ट्रिब्यून’वर आणि बातमी देणार्‍या पत्रकार रचना खेरा यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावर एडवर्ड स्नोडेनने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. ‘आधार’ची गोपनीय माहिती उघड होत असल्याचे वृत्त देणार्‍या पत्रकाराला पुरस्कार दिला पाहिजे. त्याची चौकशी व्हायला नको. सरकारला खरोखरच जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोट्यवधी भारतीयांची गोपनीयता भंग करणारे धोरण बदलावे. या माहिती चोरीला जबाबदार असणार्‍यांना अटक करायची आहे तर ते ‘यूआयडीएआय’चे अधिकारी आहेत, असा सल्ला स्नोडेनने भारत सरकारला दिला.
‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने 3 जानेवारी रोजी ‘आधार’बाबत वृत्त दिले होते. ट्रिब्युनच्या पत्रकार रचना खेरा यांनी काही एजंटांशी संपर्क साधला होता. या एजंटांनी रचना यांना 500 रुपयांमध्ये एक सॉफ्टवेअर, लॉग इन आयडी, पासवर्ड दिला. या सॉफ्टेवेअरवर लॉग इन करून कोणताही आधार क्रमांक टाकल्यावर त्याबाबतची माहिती मिळवणे शक्य झाले. आणखी 300 रुपये दिल्यावर एजंटांने रचना यांना आधारकार्ड प्रिंट करणारे सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले होते. पाचशे रुपयांमध्ये व्हॉटस्अ‍ॅपवरही कोणत्याही आधार क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देऊ, असेही एजंटाने सांगितल्याचे ‘द ट्रिब्युन’च्या वृत्तात म्हटले होते.
आधी ‘यूआयडीएआय’ने या वृत्ताचे खंडन करताना आधारची माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले होते. उलट ‘द ट्रिब्युन’चे वृत्त खोडसाळ असल्याचा आरोपही केला होता. मात्र, त्यानंतर ‘यूआयडीएआय’च्या अधिकार्‍यांनी ‘द ट्रिब्यून’वर आणि बातमी देणार्‍या पत्रकार रचना खेरा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, माध्यमांना आणि ‘जागल्यां’ना लक्ष्य करण्याचा या कारवाईचा उद्देश नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.       
या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून विरोधक आणि पत्रकारांच्या संघटनांनी टीका सुरू केल्यानंतर सरकारने घाईघाईत स्पष्टीकरण देताना वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. यापूर्वीही स्नोडेनने ‘आधार‘बाबत धोक्याचा इशारा दिला होता. या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे त्याने म्हटले होते. लोकांच्या खाजगी आयुष्याची परिपूर्ण माहिती साठवण्याची कोणत्याही सरकारची नैसर्गिक प्रवृत्ती असते. कायदे कोणतेही असोत, पण निष्कर्ष वाईटच असल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत, असे स्नोडेनने म्हटले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: