Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोतवाल मारहाण प्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: re4
5पळशी, दि. 8 : चोरटी वाळू घेऊन झरे, ता. आटपाडी येथे निघालेल्या डम्परला थांबवण्याचा प्रयत्न केला असता राणंद येथील कोतवाल कृष्णदेव दत्तात्रय गुजर (वय 34) यांना रविवारी जबर मारहाण करून पसार झालेल्या सहा संशयितांवर शासकीय कामात अडथळा आणणे, विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरण्याचा प्रयत्न, शासकीय नोकरास जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, या आरोपांखाली म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
माणगंगा नदीपात्रातून वाळू भरून एक डम्पर म्हसवडच्या बाजूने वीरकरवाडी चौकात शनिवारी मध्यरात्री 12.45 वाजता आला होता. त्यावेळी तेथे विनापरवाना वाळू चोरी करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तीन तलाठी व एक कोतवाल तेथे थांबले होते. त्यांनी तो डम्पर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डम्पर न थांबता पुढे गेला. कोतवाल गुजर यांनी शासकीय वाहनातून वीरकरवाडी ते काळचौंडी दरम्यान डम्परचा पाठलाग केला. त्याचा राग धरुन वाळू चोरट्यांनी काळचौंडी व झरे या दरम्यान कोतवाल कृष्णदेव गुजर यांना काठी, लोखंडी टॉमी, गज व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत शिवीगाळ केली.
त्यांच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेऊन संशयितांनी गुजर यांना अर्धमेल्या अवस्थेत शासकीय गाडीत  टाकून झरे येथे आणले. तेथे गाडी सोडून संशयित पसार झाले. या प्रकरणी अमर कोळी, ओंकार कुलकर्णी, सागर सुळे, विनोद वाघमारे, नितीन मेटकरी व एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: